प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सादर केलेल्या बायोमिथेनेशन प्रकल्पांसंदर्भातील प्रस्तावांना आवश्यक मंजुरी घेण्यासाठी चर्चा करून सोनसडय़ावरील सर्व विकासकामांना मंजुरी घेण्यात आली. पालिकेच्या स्थायी समितीने महामंडाळाने सादर केलेल्या विविध प्रस्तावांना आधीच मंजुरी दिली होती. गुरुवारी मंडळासमोर सदर प्रस्ताव ठेवण्यात आले असता गोंधळाच्या वातावरणात चर्चा करून मान्यता घेण्यात आली.
नगरसेवक आर्थुर डिसिल्वा, रूपेश महात्मे, नगरसेविका डॉरिस टेक्सेरा यांनी काही आर्थिक बाबींवर प्रश्न उपस्थित केले असता त्यास साहाय्यक अभियंत्यांना स्पष्टीकरण देण्यास नगराध्यक्षा पूजा नाईक काणेकर यांनी सांगितले व त्यांनी बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प, त्यासाठी 2 हजार चौरस मीटर शेड तसेच संरक्षक भिंत उभारण्यासाठी येणाऱया वेगवेगळया खर्चाची आकडेवारी महामंडळाने पाठविलेल्या अहवालानुसार वाचून दाखविली.
नगराध्यक्षांकडून खर्चाचे समर्थन
यावेळी नगरसेवक आर्थुर डिसिल्वा यांनी साखळी पालिकेने असेच पाच टन बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प उभारण्यासाठी निविदा जारी केल्याचे कागदपत्र दाखवत त्यांच्या तुलनेत मडगाव पालिका विकत घेत असलेल्या यंत्रांची किंमत दीड कोटींनी जास्त आहे असा सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगराध्यक्षा नाईक काणेकर यांनी यात अन्य बांधकामे समाविष्ट असल्याचा व नवीन जीएसआरचा उल्लेख केला व अंदाजित खर्च योग्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पालिकेला 14 व्या वित्त आयोगाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून सोनसडय़ावरील कचरा व्यवस्थापनाशी संबंधित ही विकासकामे मार्गी लावण्यात येणार असून त्यासाठी 42.79 कोटी रुपये पालिकेला घनकचरा महामंडळाकडे सुपूर्द करावे लागणार आहेत.
केवळ चार-पाच नगरसेवकांकडून विरोध : नगराध्यक्षा
बैठकीनंतर नगराध्यक्षा नाईक काणेकर यांना बायोमिथेनेशन प्रकल्पासंदर्भातील निर्णयाबद्दल विचारले असता घनकचरा महामंडळाकडून सगळी कामे केली जाणार असून गुरुवारच्या बैठकीत त्यास मंजुरी घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोंधळातच हा निर्णय झाला असून काही विरोधी गटातील नगरसेवक 13 जणांनी सदर प्रकल्पास विरोध केल्याचे सांगत आहेत याकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या की, त्यात तथ्य नसून फक्त रुपेश महात्मे, डॉरिस टेक्सेरा, अविनाश शिरोडकर व मनोज मसूरकर अशा चार-पाच नगरसेवकांनी आपला विरोध दर्शविला. त्याची नोंद ठेवण्यात आली आहे. विरोधी गटातील आर्थुर डिसिल्वा यांनी विकासकामे होत असल्यास आपला पूर्ण पांठिबा असल्याचे सांगून निर्णयाचे समर्थन केले याकडे नगराध्यक्षांनी लक्ष वेधले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दंडावर चर्चा
मडगाव पालिकेला गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोनसडय़ावरील आगीच्या घटनेमुळे पर्यावरणाची हानी झाली म्हणून 1 कोटीचा दंड ठोठावला आहे. त्यासंदर्भात गुरुवारी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व त्यावेळी फोमेन्तोकडे सोनसडय़ाचा ताबा होता हे लक्षात आणून देण्यासाठी मंडळाला मुख्याधिकाऱयांनी पत्र लिहावे, असे ठरविण्यात आले.
पालिका इमारत ही वारसा इमारत असल्याने सौरउर्जा पॅनल पालिकेच्या इमारतीवर बसविण्याचा पालिका संचालकांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. पे-पार्किंगच्या प्रस्तावाच्या वेळी गदारोळ माजल्याने निर्णय होऊ शकला नाही. पालिकेच्या कर्मचाऱयांचा निवृत्ती वेतनाचा विषय न्यायालयाच्या निर्देशानुसार मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले. पालिका मंडळाचा कार्यकाळ संपण्यास जेमतेम तीन आठवडे शिल्लक असून या मंडळाची ही शेवटची बैठक ठरणार आहे. सुमारे 33 विषय या बैठकीत चर्चेस घेण्यास आले.