प्रतिनिधी/ मडगाव
शॅडो कौन्सिल फॉर मडगावने सोनसडा शेडच्या आत जमा झालेला कचरा आणि सोनसडा प्रकल्पात दिला जाणारा दैनंदिन ओला कचरा यासंदर्भात कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी व समस्या जाग्यावर घालण्यासाठी मडगाव पालिकेला आणखी 6 महिन्यांचा अवधी दिला असून पालिकेने हे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
मडगाव पालिकेने कचऱयाचा निकाल न लावता वेळोवेळी फक्त घोषणा करण्याऐवजी कृती करण्यास त्यांना उद्युक्त करावे या हेतूने हे आव्हान दिल्याचे कुतिन्हो यांनी पुढे म्हटले आहे. सोनसडा यार्डला भेट दिलेल्या आणि सोनसडय़ावरील कामकाज हाताळण्यासंदर्भात स्वेच्छेने मदतीचा प्रस्ताव देणाऱया नागरिकांविरुद्ध पालिका बैठकीत प्रश्न उपस्थित केल्याने आम्हाला हे आव्हान पालिका आणि त्यांचे सल्लागार यांना देणे भाग पडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा फॉरवर्डच्या नगरसेविका व पालिकेच्या माजी नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी पालिकेच्या लेखी परवानगीशिवाय नागरिकांनी सोनसडा डम्प यार्डमध्ये प्रवेश करू नये अशी टिपणी केली आहे. कारण त्यांनी कंत्राटदारावर व कामगारांवर दरमहा 30 लाख रु. खर्च केल्यावरही कचरा वर्गीकरण न होता मिश्र स्वरूपात येतो हे आम्ही उघड केल्याने त्या अस्वस्थ झाल्या असाव्यात, अशी टीका कुतिन्हो यांनी केली आहे.
येथे हे लक्षात घ्यायला हवे की, फोमेन्तोच्या वेळी प्रकल्पामध्ये पडलेला असाच मिश्र कचरा बायोरेमेडिएशन कंत्राटदाराला देण्यात आला होता. त्याने सदर कामासाठी पालिकेला 85 लाखांचे बिल दिले आहे. आम्हाला आता अशी शंका आहे की, बायोरेमेडिएशन करणाऱया कंत्राटदाराला सार्वजनिक निधीतून जादा काम देण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले गेले असावे, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.