प्रतिनिधी/ मडगाव
सोनसडय़ावर दैनंदिन गोळा होणाऱया कचऱयावर बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया करण्यासंदर्भात शनिवारी पालिकेच्या नगरसेवकांना घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सोनसडाप्रकरणी कोणतेही राजकारण न करता येथे बायोमिथेनेशन प्रक्रियेसाठी उच्चाधिकार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार 50 टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यास पालिका राजी असल्याचे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
नवीन पालिका मंडळातील बहुतेक सदस्य नवीन असल्याने मागील मंडळाने घनकचरा व्यवस्थापन महामंडळामार्फत 7 बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प उभारण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांना हे प्रक्रिया प्रकल्प कसे कार्यरत राहतील यासंदर्भात माहिती देण्यासाठी सदर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
सरदेसाई यांनी चार दिवसांपूर्वी सोनसडय़ाला भेट दिली असता घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडून निविदा काढण्यास वेळकाढूपणा सुरू असल्याने पालिकाच घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचा प्रस्ताव पुढे नेणार असे सांगितले होते. मात्र शनिवारी सदर प्रात्यक्षिकानंतर बोलताना त्यांनी सोनसडय़ासंदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने चार महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत 7 वेगवेगळे लघुप्रकल्प उभारण्याऐवजी 50 टन क्षमतेचा मोठा एकच प्रकल्प उभारण्याचे ठरविताना त्यासाठी निविदा काढल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले होते, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर याबाबत काहीही झालेले नसून आता तरी त्यासंदर्भात कृती करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
पालिका मंडळ यासंदर्भात बैठकीत निर्णय घेणार आहे. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे तज्ञ असल्याने त्यांच्यामार्फत कामे होणे आवश्यक असून पालिकेचा तांत्रिक विभाग मिळेल ते ठरवू शकत नाही. कारण आता पालिका मंडळ अस्तित्वात आहे, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले. कोणतेही राजकारण न करता सोनसडा समस्या सुटायला हवी, असे मत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मांडले. सध्या दैनंदिन कचऱयावर प्रक्रियेसाठी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या तज्ञांकडून सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, अन्य नगरसेवक , मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना घनकचरा महामंडळाचे जोगळेकर यांनी यावेळी प्रात्यक्षिकातून माहिती दिली.