घरोघरी ज्येष्ठा गौरीचे आगमन
प्रतिनिधी/कोल्हापूर
हाती कडे पायी तोडे,
पैंजनाची रूणुझुणू,
नथकुडी बाळी बुगडी,
कंकणाची झुमझुम मधूर ध्वनीच्या नादामध्ये,
भक्ताघरी चालली,
सोनियाच्या पावलांनी गौराई आली घरी…..
गवरीच्या महिन्यात लागली गवर फुलायला, वहिल्या राणात गवराई आली, वाजत गाजत घरी तिला आणली...',
गण्या गुलाल उधळितो…’ यासह विविध पारंपरिक गीते म्हणत रविवारी घरोघरी ज्येष्ठा गौरीचे आगमन करण्यात आले. पंचगंगा नदी घाटासह कळंबा तलाव, राजाराम तलाव, राजाराम बंधारा व कोटीतिर्थ आदी ठिकाणी तर गौराबाईच्या आगमनाचा मेळाच भरला. या मेळ्यात साजशृंगारात नटलेल्या सुवासिनींसह तरुणीं आणि मुली मोठ्याप्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी गौराईच्या डहाळ्यांना नदी पात्रात स्नान घालून हळदी-कुंकवाचे पुजन केले. यानंतर गौराईची पारंपरिक गीते सादर करत फेर धरला. या फेरात मनसोक्त फुगडीही घातल्या. यानंतर पारपरिक वाद्याच्या गजरात गौराईच्या ढहाळ्यांना घरी नेण्यात आले.
लाडक्या बाप्पांपाठोपाठ गौराईचे रविवारी घरोघरी आगमन झाले. माहेरवाशिन गौराईच्या स्वागतासाठी सुवासिनीसह तरुणींही आतूर झाल्या होत्या. पंचगंगा नदीच्या पाण्यात गवराईचे पुजन केल्यानंतर नदी काठावर महिलांनी गाण्यांचा फेर धरला. तसेच महिलांनी नऊवारी आणि खण्याच्या साड्यांवर कोल्हापुरी साज परिधान केला होता. गौराईच्या ढहाळ्यांना कलशामध्ये विराजमान केले. या कलाशासमोरच मानाचा विडा ठेवून आरती केली. यानंतर कलशांना डोक्यावर घेऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूकीने आपापल्या घरी नेण्यात आले. रात्री गौराईला मनपसंतीची भरजरी साडी आणि दागिन्यांनी सजविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नदीवर पोलीसांचा बंदोबस्त होता. पावसाचा जोर कायम असल्याने नदीपात्राकडे लहान मुलांना जाण्यास मज्जाव करण्यात आला.
पावसाच्या वाढलेल्या पाण्यामुळे महिलांची दक्षता
सतत पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी तुडुंब भरली आहे. त्यामुळे सुवासिनींना गौराईच्या ढहाळ्यांना स्नान घालतेवेळी फार सावधगिरी बाळगावी लागली. पोलीसांनी लहान मुलींना नदीच्या पात्राजवळ येऊच दिले नाही. वाजंत्र्यांना लावलेल्या बॅरिकेटच्या बाहेर थांबण्याच्या सूचना दिल्या.
पारंपारिक वाद्यांना कमी प्रतिसाद
दरवर्षी पारंपारिक वाद्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने वाजंत्र्यांचा चांगला व्यवसाय होत होता. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाजंत्र्यांना प्रतिसाद न मिळाल्याने व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे त्यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आले.