प्रतिनिधी /बेंगळूर :
प्रधानमंत्री साहाय्यता निधीबाबत जनतेची दिशाभूल करणारे आणि खोटे ट्विट केल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध शिमोगा जिल्हय़ातील सागर येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन एफआयआर दाखल करणाऱया पोलीस अधिकाऱयाला निलंबित करावे तसेच एफआयआर मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
आयएनसी इंडिया या नावाने काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट सोनिया गांधी या अकबर रोड, नवी दिल्ली येथील कार्यालयातून हाताळत आहेत. या अकाऊंटवरून अनेक संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकारविरुद्ध 11 मे रोजी पोस्ट करण्यात आले होते. प्रधानमंत्री साहाय्यता निधीतील रकमेचा दुरुपयोग होत असल्याचा आशय असणारे संदेश पोस्ट करून भारत सरकारविरुद्ध अविश्वास दाखविला आहे. पंतप्रधानांनी या निधीतील रक्कम वैयक्तिक कारणासाठी वापरली आहे. गरीब जनतेच्या मदतीसाठी ही रक्कम वापरलेली नाही, असा खोटा संदेश देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे. त्यामुळे सोनिया गांधी, ट्विटर खाते व कर्मचाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वकील प्रवीण के. व्ही. यांनी सागर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. वकील प्रवीण के. व्ही. यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिमोगा पोलिसांनी भा. दं. वि. 153 आणि 505 (1) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान सोनिया गांधीविरुद्ध शिमोग्यातील सागर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाल्याचा निषेध नोंदवून गुरुवारी राज्य काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, सतीश जारकीहोळी, सलीम अहमद, व्ही. आर. सुदर्शन, माजी खासदार व्ही. एस. उग्रप्पा यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतली. याप्रसंगी काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एफआयआर दाखल करणाऱया पोलीस अधिकाऱयाला निलंबित करावे तसेच एफआयआर मागे घ्यावा, अशी मागणी केली. यापूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी येडियुराप्पा, गृहमंत्री बसवराज बोम्माई व शिमोगा जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र पाठवून सोनिया गांधींविरुद्ध दाखल झालेला एफआयआर रद्द करावा तसेच तक्रार स्वीकारणाऱया पोलीस अधिकाऱयांना निलंबित करावे, अशी मागणी केली होती.
एफआयआर रद्द करण्याचे आश्वासन : शिवकुमार
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध सागर येथील पोलीस स्थानकात दाखल झालेला एफआयआर मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आश्वासन दिले आहे. सागर पोलीस स्थानकात घडलेल्या घडामोडीमुळे संपूर्ण देशातून आश्चर्य व्यक्त होत आहे. सोनिया गांधींनी त्यांच्याजवळ असणारी माहिती ट्विटरवर पोस्ट केली आहे. मात्र, त्यात फेरफार करून प्रवीण या युवकाने आपल्या निकटवर्तीय पोलिसामार्फत एफआयआर दाखल केला आहे. याबाबत आपण गृहमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली असून त्यांनी याबाबत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.