प्रतिनिधी/ सातारा :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणांचे महत्त्व कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. गुरूवारी गुरूपुष्यामृत योग होता. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी हेते. अशी मान्यता आहे. मात्र सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. अशी माहिती आदेश्वर ज्वेलस् यांनी दिली.
तब्बल दोन महिन्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहे. सर्वच खरेदी-विक्रीचे व्यवहार सूरू झाले आहेत. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशावर आर्थिक संकट आले आहे. रोजगार बंद झाल्याने पैशाची टंचाई निर्माण होत आहे. अशा वेळेस सण साजरी करण्यास असणारा उत्साह कमी झाला आहे. गुरूवारी गुरूपुष्यामृत योग होता. सकाळपासून सोने-चांदीची दुकाने लवकर सूरू झाली. शहरातील सर्वच दुकानात 5 ते 6 ग्राहक होते. गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू होती तर दर स्थिर हेते. मात्र दरवर्षी प्रमाणे होणाऱया गर्दीचे प्रमाण कमी झाले होते. या ग्राहकांनी कोणत्याही मोठया सोन्याच्या वस्तूची खरेदी केली नाही. तर दुपारनंतर ग्राहकांचा प्रतिसाद पुर्णच थंडावला होता. या दिवशी सोने विक्रेते लाखोची उलाढाल करतात. मात्र कोरोनामुळे काही हजाराच्या खरेदीवर विक्रेत्यांना समाधान मानावे लागले. तर काहीं ग्राहकांना सणाचे महत्त्व वाटत नसल्याचे दिसून आले.