मुंबई, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. मुंबईमध्ये सोने दरात प्रतितोळा 600 रुपयांनी वाढ झाल्यामुळे 50 हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. बुधवारी मुंबईत सोनेदराने प्रति दहा ग्रॅम 49 हजार 700 रुपयांपर्यंत मजल गाठली होती. देशाच्या आर्थिक राजधानीतच हा दर 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने देशातील अन्य शहरांमध्ये आणि ज्वेलर्सकडे मात्र तो 50 हजारांच्या वर पोहोचला होता.
मुंबईत मंगळवारी सोन्याचा दर हा 49,100 रुपये प्रतितोळा इतका होता. त्यात बुधवारी आणखी 600 रुपयांनी वाढ झाल्यामुळे तो 49,700 रुपयांवर पोहोचला. दरम्यान चांदीचा दर 58,950 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल 3,550 रुपयांनी वाढ झाल्याने चांदी दरानेही नवा उच्चांक गाठला आहे. काही शहरांमध्ये चांदीच्या किंमतीत साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिकिलो वाढ झाली असून प्रतिकिलो दर 61 हजार रुपये इतका झाला आहे. कोरोना विषाणू संकटामुळे सोन्या-चांदीच्या उच्चांकी वाढ पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1.3 टक्क्यांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,855 अमेरिकन डॉलर तर चांदी प्रतिऔंस 21.80 अमेरिकन डॉलर पातळीवर होता. गेल्या 9 वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे.
दिल्लीत प्रतितोळा 50,920 रुपये
राष्ट्रीय राजधानीतही सोन्याच्या किंमतीने बुधवारी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. दिल्लीत सोनेदर 430 रुपयांनी वाढून 50,920 रुपये प्रतितोळा झाला. मंगळवारच्या व्यापारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 50,490 रुपयांवर बंद झाला होता. दिल्लीत मंगळवारी चांदीची किंमत 2,550 रुपयांनी वाढून ते 60,400 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले. मंगळवारी हा दर 57,850 रुपये इतका होता. दिल्लीमध्ये 24 कॅरेटच्या सोन्याच्या किंमती 430 रुपयांनी वाढून नवीन विक्रम नोंदविला गेला अशी माहिती एचडीएफसी सिक्मयुरिटीजचे विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली.