तरुण भारत संवाद
पंढरपूर / प्रतिनिधी
“या….पंढरपुरात वाजत गाजत….सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं…’’ या भक्तीगीतांच्या आणि विठुरायांच्या जयघोषात आज विठ्ठलाचे आणि रूकिमणीमातेचा विवाहसोहळा येथील विठ्ठल मंदिरात मोठय़ा थाटामाटात आणि सनई चौघडयांच्या निनादात संपन्न झाला. यावेळी सुमारे दोन हजाराहून अधिक वऱहाडी मंडळीही उपस्थित होती.
सकाळी साधारणपणे 9 वाजता रूक्मिणी स्वयंवराची कथा सभामंडपात सुरू झाली. यावेळी संपूर्ण विठ्ठल मंदिर फ्gढलांनी एका लग्नमंडपाप्रमाणे सजविण्यात आले होते. याप्रसंगी वसंतपंचमीनिमित्त विठ्ठलास आणि रूक्मिणीमातेस शुभ्र वेश परिधान करण्यात आला होता. परंपरेप्रमाणे रूक्मिणीमातेच्या गर्भगृहातून मानाचा गुलाल हा विठ्ठलाच्या गर्भगृहात नेण्यात आला. तेथे विठ्ठलाची विधीवत पूजा करून विठ्ठलाच्या अंगावर गुलाल उधळण्यात आला. त्यानंतर सदरचा गुलाल हा विठ्ठलाकडून रूक्णीमातेकडे आणण्यात आला. याठिकाणी हा गुलाल रूक्मिणीमातेच्या अंगावरही उधळण्यात आला. त्यानंतर रूक्मिणीमातेची पूजा करून मुख्य विवाह सोहळयास सुरूवात झाली.
साधारणपणे सकाळी साडे अकराच्या सुमारास येथील सभामंडपामध्ये विठ्ठलाची आणि रूक्मिणीमातेची अलंकाराने सजविलेली उत्सवमूर्ती आणण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. अनुराधादीदी शेटे यांनी रूक्मिणी स्वयंवराचा शेवटचा अध्याय सांगण्यास सुरूवात केली. याप्रसंगी विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरण्यात आला आणि विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे लग्न मंगलाष्टका म्हणून “ शुभमंगल सावधान’’ असे म्हणत लावण्यात आले.
यावेळी मंदिर समितीकडून आलेल्या सर्व भाविकांना अक्षता वाटण्यात आल्या होत्या. सर्व भाविकांनी मोठया प्रमाणावर विवाहसोहळा झाल्यावर जल्लोष केला. यावेळी सनई चौघडेही होते. आणि याचवेळी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं अशा निनादात भजनही करण्यात आले.
विठ्ठलाच्या उत्सव मूर्तीस शुभ्र वेश परिधान करण्यात आला होता. तर रूक्मिणीमातेसही रेशमी पैठणी नेसून डोक्यापासून ते चरणापर्यत अलंकार परिधान करून सजविले होते. तसेच यावेळी दोन्हीही उत्सवमूर्तीस मोत्यांच्या मंडवळया कपाळी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे विठ्ठल आणि रखुमाई हे साक्षात नव वधू -वर वाटत होते. त्यामुळे प्रसंगी भगवंताचे दिसणारे सौंदर्य हे अनेकांना भुरळ पाडणारे होते. याचबरोबरीने येथील उत्पात समाजाच्या देखिल रूक्मिणीमाता उपासना मंदिरामध्ये वसंत पंचमीचा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. यामध्ये विठोबाचा आणि रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा, स्वयंवर कथा आणि झाल्यावर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.
विठोबाची रंगपंचमी सुरू
वसंतपंचमी ते रंगपंचमीपर्यत विठ्ठलास पांढरा शुभ्र वेश परिधान करण्यात येत असतो. यावेळी वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यत दररोज गुलालांची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते. आणि यातून सुमारे महिनाभर विठ्ठलाची रंगपंचमी होते. याच रंगपंचमी उत्सवाचा शुभारंभही आज वसंतपंचमीच्या निमित्ताने झाला. त्यामुळे आजपासून सावळया विठोबाचे रूप शुभ्र वेशात दिसणार आहे.