एखाद्या घरी मुलगी जन्माला आली असो किंवा मुलीने सासरी माप ओलांडून सून म्हणून गृहप्रवेश केला असो तर असं म्हणतात की,‘सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीच घरात आली’. ही एक भाबडी समजूत असते किंवा आपला विश्वास असतो. सूनेच्या येण्याने कुटुंबावर ओढवलेलं मोठं संकट टळलं, तिच्या येण्याने विस्कटलेल्या कुटुंबाची घडी पुन्हा एकदा बसू लागली. अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात. काहींचा या गोष्टीवर विश्वास असतो, तर काहींचा नसतो. प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. आपल्या कथेतील भाग्यश्रीची गोष्ट आणि तिचा प्रवास या सगळय़ांहून जरा वेगळा आहे असे म्हणावे लागेल. भाग्यश्रीच्या नशिबात इनामदारांची सून होणं लिहिलेलच होतं म्हणून तिची भेट दुष्यंतशी झाली आणि ते अपघाताने लग्नाच्या बंधनात अडकले. पण लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य पूर्णतः बदललं. तिला ‘वाहिनीसाहेब’ हा मान मिळाला.ज्यामुळे भाग्यश्रीला वाहिनीसाहेब हा मान मिळाला त्या सोन्याच्या पावलांचा आणि भाग्यश्रीचा काय संबंध आहे? इनामदार घराण्यातील वडीलोपार्जित सोन्याची पावलं याचं काय रहस्य आहे? या पावलांच्या पुण्याईवर दुष्यंतचा मुळीच विश्वास नाहीये. भाग्यश्रीचे दैव आणि दुष्यंतचा त्यावरील अविश्वासामध्ये कोण खरं ठरेल?
एका छोटय़ा गावामध्ये मध्यम वर्गीय घरात वाढलेली भाग्यश्री ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि मेहनती मुलगी आहे. ‘आपण आपलं काम करत राहावं, एक ना एक दिवस देव त्याचं फळ देईल’ हे भाग्यश्रीच्या जगण्याचे सूत्र आहे. भाग्यश्री दहा वर्षांची असताना तिची आई देवा घरी गेली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईच्या जाचाला कंटाळलेल्या भाग्यश्रीला आता यातून सुटकेचा एकमेव मार्ग दिसतो आहे आणि तो म्हणजे लग्न तर, दुसरीकडे इनामदार घराण्याचे शेंडेफळ दुष्यंत इनामदार. अत्यंत देखणा, इतरांना सल्ले देणारा, एका हाकेवर धावणारा, लोकांना मदत करणारा. या सवयीमुळे त्याची भाग्यश्रीशी ओळख होते आणि अपघाताने भाग्यश्री-दुष्यंतचं लग्न होतं. एकमेकांचे जोडीदार बनून ते एक नवं विश्व निर्माण करतील? इनामदारांच्या घराची सून ते गावाची वाहिनीसाहेब होण्यापर्यंतचा भाग्यश्रीचा हा प्रवास कसा असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
Previous Articleश्वानप्रेमाचे अनोखे उदाहरण
Next Article कोशिश करनेवालों की…!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.