ऑनलाईन टीम / मुंबई :
सोन्याच्या दरात मागील दोन दिवसात प्रतितोळा 5000 रुपयांची घट झाली आहे. मागील आठवड्यात 56,191 रुपयांचा उच्चांक नोंदवल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा 50 हजारांखाली आले आहेत. अमेरिकी रोखे आणि डॉलर वाढल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कोसळले आहेत.
सोन्याचे दर वाढल्यानंतर भारतीय बाजारात मागणीमध्ये मोठी घट झाली होती. मागील चार महिने सातत्याने सोन्याची आयात घटत आहे. लग्नसराई आणि इतर कारणांसाठी सोन्याची खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांनी खरेदी पुढे ढकलली होती. दरामध्ये घट झाल्याने खरेदीदारांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
सोन्यासोबतच चांदीच्या दरांमध्येही मागील दोन दिवसात पंधरा हजार रुपये प्रति किलो घट झाली आहे. चांदीचे दर बुधवारी सकाळी वायदे बाजारात 61 हजार रुपये होते. मागील आठवड्यात चांदीने 77 हजार 949 रुपयांचा उच्चांक गाठला होता.