प्रतिनिधी/ बेळगाव
जागतिक बाजारातील घडामोडींमुळे शुक्रवारी सोन्याचा दर प्रति तोळा 50 हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्याला झळाळी प्राप्त झाली आहे. सोन्यासोबतच चांदीचा दर प्रतिकिलो 51 हजार 900 पर्यंत पोहोचला आहे. यामुळे सोने व चांदी खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्मयाबाहेर गेले आहे.
कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारत-चीन तानले गेलेले संबंध, सोन्याच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ व शेअरबाजारामध्ये चढ-उतार या सर्वांचा परिणाम सोन्याच्या दर वाढीवर झाला आहे. याचा परिणाम सराफी व्यवसायावर झाला असून, सोने खरेदीचा उत्साह ओसरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली दुकाने व त्यानंतर सोने व चांदीचे वाढलेले दर यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
शुक्रवारी बेळगावच्या किरकोळ सराफी दुकानांमध्ये 50 हजार 650 रुपये दराने प्रति 10 ग्रॅम दराने सोन्याची विक्री केली जात होती. तर 51 हजार 900 रुपये प्रति किलो दराने चांदीची विक्री होत होती. एकीकडे जून व जुलै महिन्यात लग्न सोहळे उरकले जात असताना सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे परवडेल एवढय़ाच किमतीचे दागिने खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अनेकजण जुनेच दागिने नव्या पद्धतीने तयार करून घेत आहेत.
वैभव वेर्णेकर (अध्यक्ष दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन)
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम हा सोन्याच्या दरावर होत आहे. भारत व चीन यांच्यातील संबंध ताणले गेले तसेच आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात थांबल्यामुळे सोन्याचे दर दिवसागणिक वाढत आहेत. यामुळे खरेदीचे प्रमाण कमी झाले असून, याचा परिणाम व्यवसायावर जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.