दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू ः पोलीस-सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील सोपोरच्या आरामपोरा येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस जवानांना वीरमरण आले असून दोन नागरिकांचाही बळी गेल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. या गोळीबारात अन्य काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
बारामुल्ला जिल्हय़ातील सोपोर शहरातील मुख्य चौकात केंद्रीय राखीव दलाची तुकडी गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान व दोन सामान्य नागरिक ठार झाले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा हल्ला झाला. जखमी झालेल्या चौघांना तत्काळ लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. सोपोरमध्ये झालेल्या गोळीबारामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भागात सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरू असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये शुक्रवारी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी सोपोर येथेही हल्ला झाल्याने सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्याने संयुक्तपणे अभियान चालवत शोधमोहीम तीव्र केल्यामुळे आता अन्यत्र घातपातसत्र सुरू झाले आहे. यापूर्वी 6 मे रोजी शोपिया जिह्यात चकमक उडाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तसेच एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते. सदर सर्व दहशतवादी अल बदर दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती चौकशीअंती पुढे आली होती.