सलग 3 पराभवांची मालिका खंडित, पंजाब किंग्सला नमवले, गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप
अबु धाबी / वृत्तसंस्था
हार्दिक पंडय़ाला अखेर हवाहवासा सूर सापडल्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्सला 6 गडी राखून नमवले व प्ले-ऑफसाठी आपले आव्हान कायम राखले. 30 चेंडूत 40 धावांची आतषबाजी करणाऱया हार्दिकने शमीच्या एकाच षटकात 2 चौकार व 1 षटकार फटकावले आणि याचमुळे मुंबईला सलग 3 पराभवांची मालिका खंडित करता आली.
या लढतीत पंजाब किंग्सला 20 षटकात 6 बाद 135 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 136 धावांचा यशस्वी पाठलाग केला असला तरी यासाठी त्यांना 19 व्या षटकापर्यंत झुंजावे लागले. सौरभ तिवारी (37 चेंडूत 45) व केरॉन पोलार्ड (नाबाद 15) यांनीही अंतिम टप्प्यात अतिशय मोलाचे योगदान दिले.
पोलार्डचे अष्टपैलू योगदान
गोलंदाजीत 2 बळी घेणाऱया पोलार्डने फलंदाजीतही लक्षवेधी प्रदर्शन साकारताना डावखुऱया अर्शदीपच्या गोलंदाजीवर 1 षटकार व 1 चौकार वसूल केला. हार्दिकचा झेल दीपक हुडाने सीमारेषेजवळ घेण्याची संधी दवडल्याने षटकार मिळाल्याने मुंबईच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब झाले. या विजयासह मुंबईचा संघ 11 सामन्यात 10 गुणांसह पाचव्या स्थानी झेपावला आहे. पंजाबचा संघ मात्र सहाव्या स्थानी घसरला.
धावफलक
पंजाब किंग्स ः केएल राहुल झे. बुमराह, गो. पोलार्ड 21 (22 चेंडूत 2 चौकार), मनदीप सिंग पायचीत गो. कृणाल 15 (14 चेंडूत 2 चौकार), ख्रिस गेल झे. हार्दिक, गो. पोलार्ड 1 (4 चेंडू), एडन मॅरक्रम त्रि. गो. चहर 42 (29 चेंडूत 6 चौकार), निकोलस पूरन पायचीत गो. बुमराह 2 (3 चेंडू), दीपक हुडा झे. पोलार्ड, गो. बुमराह 28 (26 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हरप्रीत ब्रार नाबाद 14 (19 चेंडू), नॅथन इलिस नाबाद 6 (4 चेंडू). अवांतर 6 (बाईज 1, लेगबाईज 2, नोबॉल 1, वाईड 2). एकूण 20 षटकात 6 बाद 135.
गडी बाद होण्याचा क्रम
1-36 (मनदीप, 5.2), 2-39 (ख्रिस गेल, 6.2), 3-41 (केएल राहुल, 6.4), 4-48 (पूरन, 7.3), 5-109 (मॅरक्रम, 15.2), 6-123 (हुडा, 18.4).
गोलंदाजी
कृणाल पंडय़ा 4-0-24-1, ट्रेंट बोल्ट 3-0-30-0, जसप्रित बुमराह 4-0-24-2, नॅथन काऊल्टर-नाईल 4-0-19-0, केरॉन पोलार्ड 1-0-8-2, राहुल चहर 4-0-27-1.
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. मनदीप, गो. बिश्नोई 8 (10 चेंडूत 1 चौकार), क्विन्टॉन डी कॉक त्रि. गो. शमी 27 (29 चेंडूत 2 चौकार), सुर्यकुमार यादव त्रि. गो. बिश्नोई 0 (1 चेंडू), सौरभ तिवारी झे. राहुल, गो. इलिस 45 (37 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 40 (30 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), केरॉन पोलार्ड नाबाद 15 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 2. एकूण 19 षटकात 4 बाद 137.
गडी बाद होण्याचा क्रम
1-16 (रोहित, 3.3), 2-16 (सुर्यकुमार, 3.4), 3-61 (डी कॉक, 9.5), 4-92 (सौरभ तिवारी, 15.1).
गोलंदाजी ः एडन मॅरक्रम 3-0-18-0, मोहम्मद शमी 4-0-42-1, अर्शदीप सिंग 4-0-29-0, रवी बिश्नोई 4-0-25-2, नॅथन इलिस 3-0-12-1, हरप्रीत ब्रार 1-0-11-0.
8 रोजी एकाच वेळी दोन्ही सामने
8 ऑक्टोबरचे दोन्ही सामने सायंकाळी एकाच वेळी का? हे आहे खास कारण!
आयपीएल उत्तरार्धात दि. 8 ऑक्टोबर रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स व आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशा दोन लढती होणार आहेत. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, यातील एक लढत दुपारी 3.30 वाजता तर दुसरी लढत सायंकाळी 7.30 वाजता होणे अपेक्षित होते. मात्र, आयपीएल कार्यकारिणीने यात बदल करत दोन्ही सामने सायंकाळी 7.30 वाजता एकाच वेळी खेळवले जाणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही लढती एकाच वेळी होणार असल्याने चाहत्यांचा हिरमोड होणे साहजिक आहे. मात्र, दुपारची पहिली लढत झाल्यानंतर प्ले-ऑफ क्वॉलिफिकेशनचे नेमके चित्र स्पष्ट झाले असते व सायंकाळच्या सत्रात दोन्ही संघांपैकी कोणीही याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊ शकले असते. ते टाळण्यासाठी आयपीएल कार्यकारिणीने हा निर्णय घेतला आहे.