पुरातत्व विभागाचा खुलासा : मंदिराखाली एल आकाराची इमारत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराखाली भूगर्भात 3 मजली इमारत असल्याचे समोर आले आहे. आयआयटी गांधीनगर आणि 4 सहकारी संस्थांच्या पुरातत्व तज्ञांनी याचा शोध लावला आहे. हे संशोधन पंतप्रधान आणि सोमनाथ मंदिराचे विश्वस्त नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार करण्यात आले होते. सुमारे एक वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत मोदींनी पुरातत्व विभागाला हे संशोधन करण्यास सांगितले होते.
पुरातत्व विभागाच्या एक वर्षाच्या तपासणीनंतर 32 पानी अहवाल तयार करून सोमनाथ ट्रस्टला सोपविण्यात आला आहे. मंदिराखाली एल आकाराची आणखी एक इमारत असल्याचे अहवालात नमूद आहे. सोमनाथ मंदिराच्या दिग्विजय द्वारापासून काही अंतरावर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ानजीक बौद्धकालीन गुहा असल्याचेही समोर आले आहे.
वैज्ञानिक पद्धतीने अहवाल
तज्ञांनी सुमारे 5 कोटी रुपयांच्या आधुनिक यंत्रांच्या मदतीने मंदिर परिसरात भूगर्भीय तपासणी केली होती. जमिनीखाली सुमारे 12 मीटरपर्यंत जीपीआर तपास केला असता एक पक्की इमारत आणि प्रवेशद्वार असल्याचे आढळून आले आहे.
5 राजांकडून जीर्णोद्धार
सर्वप्रथम एक मंदिर अस्तित्वात होते, सातव्या शतकात वल्लभीच्या मैत्रक राजांनी दुसऱयांदा मंदिर उभारले होते. आठव्या शतकात सिंधचे अरबी गव्हर्नर जुनायद यांनी मंदिर पाडण्यासाठी स्वतःचे सैन्य पाठविले होते. त्यानंतर प्रतिहार राजा नागभट्ट यांनी 815 साली हे मंदिर तिसऱयांदा उभारले होते. याच्या अवशेषांवर मालवाचे राजा भोज आणि गुजरातचे राजा भीमदेव यांनी चौथ्यांदा मंदिराची उभारणी केली होती. पाचवी निर्मिती 1169 मध्ये गुजरातचे राजा कुमाल पाल यांनी करविली होती.
पटेल यांची भूमिका
मुघल बादशाह औरंगजेबने 1706 मध्ये पुन्हा मंदिर पाडविले होते. जूनागढ संस्थान भारतात विलीन झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 साली सोमनाथ मंदिर पुन्हा उभारण्याचा आदेश दिला होता. गुजरातमधील हे नवे मंदिर 1951 मध्ये पूर्ण झाले होते.