प्रतिनिधी / सातारा :
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात पॉवरफुल पवार घराण्याने आजारी साखर कारखाने अत्यल्प किंमतीत विकत घेण्याची एक वेगळी मोडस ऑपरेंडी राबविली आहे. कारखाने विकत घेणारे पण हेच, व्हॅल्युएटर सुध्दा यांचेच, लिलाव प्रक्रियेत सुध्दा हेच शरद पवार. या पॉवरफुल परिवाराने शिकण्यासाठी मला हा वेगळा विषय दिला आहे, अशी जोरदार राजकीय टोलेबाजी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, जरंडेश्वर कारखान्याच्या शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 5 ऑक्टोबरला मी जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार आहे, अशी माहिती सोमेय्या यांनी दिली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे जाताना मंगळवारी पहाटे सातारा विश्रामगृहात थांबले होते. सकाळी सात वाजता जरंडेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, राज्यातील काही कारखाने अडचणीत होते, ते कोणीतरी चालविण्यास घेतले. काही ठिकाणी घोटाळे झालेले आहेत. तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही माझी भुमिका आहे. जरंडेश्वर प्राथमिक अहवालात 65 कोटीला बेनामीपणे विकत घेण्यात आला आहे. येथील शेतकयांच्या न्यायासाठी मी जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने राजकीय नेत्यांच्या घशात घालून खासगी मालकीचे करण्याची खास पॉवर पध्दत बारामतीच्या पवार परिवाराने निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकरी भिकेला लागले आणि राजकीय नेते कारखानांच्या माध्यमातून करोडपती होत आहेत, असेही सोमय्या म्हणाले.