प्रतिनिधी/ दापोली, खेड
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोलीतील मुरुड येथील समुद्रकिनारी पालकमंत्री अनिल परब यांनी बेकायदा रिसॉर्ट बांधल्याचा व त्यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. यामुळे त्यांनी 26 मार्च रोजी ‘चलो दापोली’ असा नारा देत प्रतिकात्मकरित्या हातोडा हातात घेत रिसॉर्ट तोडण्यासाठी मुंबईतून ताफा घेऊन दापोलीकडे रवाना झाला. सोमय्यांसह वाहनांच्या ताफ्याने रायगड हद्द ओलांडल्यानंतर कशेडी घाटात प्रवेश करताच येथील पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. यावेळी सोमय्यांना पोलिसांनी बजावलेली 149 ची नोटीस स्वीकारत त्यावर सही न करताच ते दापोलीच्या दिशेने रवाना झाले. यानंतर दापोली पोलिसात चौकशीसाठी बोलावलेल्या सोमय्यांच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून पोलीस स्थानकात प्रवेश मिळवला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांत झटापट झाली. या तणावपूर्ण वातावरणानंतर पोलिसांनी दापोली-मुरूड परिसरात 144 कलम जारी केले. तरीही सोमय्यांनी मुरूडला जाताना 40 गाडय़ा नेण्याचा आपला हेका कायम ठेवला होता.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह वाहनांच्या ताफ्याने रायगड हद्द ओलांडल्यानंतर जिल्हय़ाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात प्रवेश करताच येथील पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. किरीट सोमय्यांना पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी बजावलेली 149 ची नोटीस स्वीकारत त्यावर सही न करताच ते दापोलीच्या दिशेने रवाना झाले.
किरीट सोमय्यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर महामार्गासह खेड शहरात मोक्याच्या ठिकाणी जादा पोलिसांची कुमक तैनात करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास सोमय्या यांचे भरणे व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. माजी नगराध्यक्ष आबा जोशी व शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासमवेत माजी खासदार निलेश राणे हे देखील होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा चिटणीस संजय बुटाला, ऍड. मिलींद जाडकर, भूषण काणे, राकेश पाटील, अविनाश माने, शरद सोहनी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अवघ्या 5 मिनिटातच किरीट सोमय्या दापोलीच्या दिशेने मार्गस्थ झाले.
सकाळपासूनच तणावाचे वातावरण
यावेळी दापोली पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवल्याने दापोली शहरात सकाळपासून तणावाचे वातावरण होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दापोलीत येऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली. प्रत्येक रस्त्याला कडक सुरक्षा देऊन बॅरिकेट्सही लावले. यानंतर प्रत्येक येणाऱया-जाणाऱया वाहनावर चोख नजर ठेवण्यात येत होती. शनिवारी दुपारी 3 वाजल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे आपल्या लवाजम्यासह बसस्थानक परिसरात येऊन दाखल झाले. त्यांनी काळे झेंडे दाखवत किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, प्रभारी तालुका अध्यक्ष ऋषिकेश गुजर, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी सोमय्या व भाजपा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दापोली व कोकणाच्या पर्यटन क्षेत्राच्या मुळावर किरीट सोमय्या उठल्याचा आरोप करून भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवले.
सोमय्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
यानंतर भाजपचे कार्यकर्ते बसस्थानकात दाखल झाले. त्यांनीही किरीट सोमय्या यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काळे झेंडे कशासाठी, भ्रष्टाचाराच्या पैशासाठी.. आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर, केदार साठे, श्रीराम ईदाते, लवू साळुंखे, संजय सावंत, स्मिता जावकर, स्वरूप महाजन, ऋषिकेश हेदुकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर भाजपचे कार्यकर्ते किरीट सोमय्या यांच्या स्वागतासाठी काळकाई कोंडजवळील मशिदीजवळ जमा झाले. सोमय्या यांच्या गाडय़ांचा ताफा दापोली शहरात आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून किरीट सोमय्या व नीलेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
पोलिसांचे कडे तोडून भाजपा कार्यकर्त्यांचा प्रवेश
यावेळी दापोली शहराकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेटस लावून बंद केले होते. यामुळे किरीट सोमय्या व निलेश राणे यांना आझाद मैदान येथून बाजारपेठमार्गे पोलीस स्टेशनकडे आणण्यात आले. पोलीस स्टेशनजवळील सर्व रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी सोमय्या यांना केवळ 5 प्रतिनिधींसह आत सोडण्याची अनुमती दर्शवली. यावर संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच बॅरिकेट्स ढकलून देऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने कूच केली. यावेळी एका पोलीस अधिकाऱयाच्या हाताला दुखापत झाली व पत्रकारांनाही दुखापत झाली. यानंतर पोलीस स्टेशनच्या गेटवर आल्यावर पोलिसांनी पोलीस स्टेशनचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून ठेवले होते. येथेही निलेश राणे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यात शाब्दीक वादावादी रंगली. यानंतर पोलिसांचे कडे तोडून भाजप कार्यकर्त्यांनी दापोली पोलिसात प्रवेश केला. यावेळी कार्यकर्ते व पोलीस यांच्यात झटापट झाली.
पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांची झुंबड
यावेळी पोलिसांनी पोलीस स्थानकाचे दार बंद करुन ठेवले होते. यामुळे पोलीस स्थानकाच्या दारासमोर सर्व कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. यावेळी पोलिसांनी पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. तसेच भाजपा कार्यकर्त्यांना समजावून निवडक कार्यकर्त्यांना आतमध्ये पाठवले. यानंतर पोलीस किरीट सोमय्या नीलेश राणे व भाजपच्या पदाधिकाऱयांची बराच वेळ पोलीस स्टेशनमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर सोमय्या हे मुरूडच्या दिशेने रवाना झाले.
दौऱयामुळे दापोलीकरांचे अतोनात हाल
सोमय्या यांच्या दापोली दौऱयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून दापोली-हर्णे रोडवर बॅरिकेट्स लावले होते. किरीट सोमय्या व नीलेश राणे हे दापोलीत दाखल होताच पोलीस स्टेशनकडे येऊन कार्यकत्यानी गर्दी करू नये, यासाठी बंद करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. यावेळी दापोली पोलीस ठाण्यासमोरील रस्ता व हर्णे रस्ता गाडय़ांनी पूर्ण जॅम झाला होता. यामुळे सामान्य दापोलीकरांचे अतोनात हाल झाले.
आमची तक्रार पोलिसांनी नोंदवली नाही नीलेश राणे
पोलीस स्थानकातून बाहेर आल्यानंतर नीलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्हांला केवळ पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले. कोणत्याही प्रकारची आमची तक्रार किंवा एफआयआर पोलिसांनी नोंदवून घेतला नाही, असा आरोप निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शिवाय आम्हांला जेथे बसवून ठेवले होते, तेथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आले नाहीत तर ते दुसऱया खोलीत बसून पालकमंत्र्यांशी फोनवर बोलत होते, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. मोहितकुमार गर्ग हे पालकमंत्री अनिल परब यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी यावेळी केला.