प्रतिनिधी / बेळगाव
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सकाळी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली. शहरातील बाजारपेठेसोबतच उपनगरांमध्येही खरेदीसाठी गर्दी झाली होती. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असल्याने खरेदी केली जात होती. याचसोबत भाजीपाला व फळे खरेदीही करण्यात आली.
कोरोना नियंत्रणात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विकेंड लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे शनिवार व रविवार असे दोन दिवस वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी भाजी, फळे, तसेच धान्य खरेदीसाठी गर्दी झाली. गणपत गल्ली, कांदा मार्केट, नरगुंदकर भावे चौक, शनिमंदिर, काकतीवेस रोड, कलमठ रोड, शिवाजी उद्यान रोड, खडेबाजार शहापूर, बाजार गल्ली वडगाव, येळ्ळूर रोड, टिळकवाडी या परिसरात भाजी तसेच फळांची विक्री केली जात होती. मागील दोन दिवसांपासून एपीएमसीतील भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होते. याचा परिणाम शहरातील किरकोळ भाजी विक्रीवर झाला. सोमवारी मोजक्मयाच प्रमाणात भाजी उपलब्ध होती.
सोमवारी सकाळी सहापासून बाजारपेठ खुली झाली. भाजी, फळे, कडधान्य, दूध यांच्या विक्रीची परवानगी देण्यात आली असल्याने ही दुकाने सुरू झाली. दुचाकीवरून येणाऱयांवर कारवाई केली जात असल्याने चालतच अनेकांनी भाजी खरेदी केली. सकाळी 10 वाजेपर्यंत दुकाने सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितल्यानंतर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.