सेन्सेक्समध्ये 167 अंकांची तेजी, आयटी समभाग जोमात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारच्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार तेजीसह आपली वाटचाल यशस्वीपणे सुरु ठेवली असल्याचे दिसून आले आहे. बीएसई सेन्सेक्स 166 अंकानी आणि निफ्टी 54 अंकांनी वधारून बंद झाल्याचे पहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 166 अंकांच्या तेजीसह 58,296.91 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या तेजीसह 17,377.80 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 समभाग तेजीसह बंद झाले. यामध्ये एचसीएल टेकचे समभाग 2.17 टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 1.52 टक्के इतक्या तेजीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले. हिंदुस्थान युनिलिव्हर, ऍक्सिस बँक, बजाज ऑटो, टीसीएस, एल अँड टी यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे इंडसइंड बँकेचे समभाग 1.13 टक्के इतके घसरले. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या निर्देशांकाने 58,515 ची सर्वोच्च पातळी गाठली होती.
बीएसईवर 3495 समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यात 1695 समभाग तेजीसह बंद झाले. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 255 लाख कोटी रुपयांवर पोहचले. बाजाराला तेजी राखण्यासाठी रियल्टी आणि आयटी क्षेत्रातील समभागांचा भक्कम आधार लाभला. निफ्टी रियल्टी निर्देशांक सलग आठव्या दिवशी तेजीसह बहरत होता. रियल्टी निर्देशांक 3.16 टक्के तेजीसह तर आयटी निर्देशांक 1.50 टक्के तेजी राखून होता. विप्रोचे समभाग सर्वाधिक 4.95 टक्के इतके तेजीत होते. जागतिक स्तरावर सौदी अरबने कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये कपात केल्याचा लाभ शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी उठविल्याचे तज्ञांनी सांगितले.
आशियाई बाजारामध्ये जपानचा निक्केई निर्देशांक 1.83 टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग 1 टक्के आणि चिनचा शांघाई कंपोझिट 1 टक्क्यांसह तेजीत होता. सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 281 अंकांच्या वाढीसह खुला झाला होता. लेबर डेमुळे अमेरिकेतील बाजार बंद होते.