सर्वजण मंगोरहिलशी संबंधीत : दोन रुग्णांची प्रकृती झाली ठिक
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सोमवारी कोरोनाचे 30 नवे रुग्ण सापडले आहेत तर दोन रुग्णांची तब्येत ठिक झाली आहे. सोमवारी सापडलेले सर्व रुग्ण हे मांगोरहिल येथील आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव निला मोहनन यांनी दिली आहे. गोव्यात सध्या कोविडचे 263 रुग्ण (एक्टीव्ह केसेस) उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 330 रुग्ण सापडले असून त्यातील 67 जणांची तब्येत ठिक झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरदिवशी कोरोनाच्या चाचणी सुरु असून सोमवारी 3 हजार 17 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील 2 हजार 26 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे पॉझिटिव्ह आले असून 961 नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. मंगोरहिल वगळता राज्यातील इतर भागातही काही रुग्ण सापडले आहेत, मात्र इतर भागात सापडलेले रुग्ण हे मंगोरहिल परिसराशी संबंधीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
95 टक्के रुग्ण हे कोरोना ‘असिम्टोमॅटिक’
मंगोरहिल येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य खाते सर्व तऱहेने प्रयत्न करीत आहे. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणारे मुख्य डॉक्टर जातीने मंगोरहिल भागात भेटी देत आहेत. तिथे काम करणाऱया आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांना योग्य मार्गदर्शन ते करीत आहेत. आत्तापर्यंत गोव्यात जे रुग्ण मिळालेले आहेत त्यातील 95 टक्के रुग्ण हे कोरोना ‘असिम्टोमॅटिक’ आहेत. आत्तापर्य एकूण 21 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्यभरात 658 जणांना विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 13 रुग्णांना शिरोडा येथील कोरोना केअर केंद्रात पाठविण्यात आले आहे.
गोव्यात 8 जून 2020 पर्यंत कोरोनाबाधित 330
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 67
उपचार घेणारे रुग्ण 263