जिल्हय़ात चौघा जणांचा मृत्यू, 68 नवे रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी जिल्हय़ातील कोरोना बाधितांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. 68 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 174 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 75,592 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 174 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 73,150 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 1667 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
बेळगाव तालुक्मयातील दोन, चिकोडी तालुक्मयातील दोन अशा एकूण चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. चारही जण सिव्हिलमध्ये दगावले आहेत. जिल्हय़ातील मृतांचा सरकारी आकडा 775 वर पोहोचला आहे. अद्याप 1947 जणांचे अहवाल यायचे आहे. सांबरा एटीएसमधील आणखी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मुतगा, कंग्राळी खुर्द, धामणे, शाहूनगर, वीरभद्रनगर, कलईगार गल्ली, रामतीर्थनगर, वैभवनगर, कंग्राळ गल्ली, वझे गल्ली-वडगाव, शिवबसवनगर, टिळकवाडी परिसरातही रुग्ण आढळून आले असून बाधितांत बेळगाव तालुक्मयातील 25 जणांचा समावेश आहे.
जिल्हय़ात 25 टक्के लसीकरण
बेळगाव जिल्हय़ातील एकूण 11 लाख 29 हजार नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये 1 लाख 67 हजार नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे. एकूण जिल्हय़ामध्ये 25 टक्के लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी एस. व्ही. मुन्याळ यांनी दिली.
आतापर्यंत जिल्हय़ातील 11 लाख लोकांनी लस घेतली असली तरी अनेकांना लसीची वाट पहावी लागत आहे. एकूण 234 लसीकरण केंदे सुरू करण्यात आली आहेत. दररोज 30 हजार लोक लस घेत आहेत. बेळगाव जिल्हय़ामध्ये 25 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे तर धारवाड जिल्हय़ामध्ये 33 टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.