सहकार क्षेत्रातील कामांबद्दल पत्रकाद्वारे केले अभिनंदन
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात सहकार खात्याची जबाबदारी सांभाळलेल्या एस. टी. सोमशेखर यांच्या कार्यपद्धतीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केले आहे. शिवाय देशात सहकार क्षेत्राला उंचीवर नेण्याचे प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच सहकार मंत्रालय स्थापन केले असून कर्नाटकातील एस. टी. सोमशेखर यांनी राज्यातील सहकार क्षेत्रासंबंधीचा अहवाल अमित शहा यांना सादर केला होता. त्यावर शहा यांनी पत्राद्वारे प्रतिक्रिया दिली असून कर्नाटकात सहकारमंत्री म्हणून काम पाहणाऱया एस. टी. सोमशेखर यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन करत असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘सहकार से समृद्धी’ याबाबतही शहा यांनी सोमशेखर यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख केला आहे. सर्व वर्गातील जनतेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे. सहकार क्षेत्राद्वारे कृषी आणि ग्रामीण भागाचा विकास होणार आहे. शिवाय भारताची सहकार क्षेत्र आणखी उंचीवर पोहोचेल, असा विश्वास आपल्याला आहे. सहकार क्षेत्राचा आणखी विकास व्हावा, राज्यातील योजना आणि कार्यक्रमांसाठी आपले नेहमी सहकार्य असेल, अशी प्रतिक्रिया ही अमित शहा यांनी दिली आहे.