केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन : राज्यातील पहिली सोलर फेरीबोट, फ्लोटिंग जेटीचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
सोलर-इलेक्ट्रिक हायब्रीड हायस्पीड फेरी आणि फ्लोटिंग जेटी या दोन्ही प्रकल्पांमुळे गोव्यातील पर्यटनाला चालना मिळेल आणि वाहतूक अधिक पर्यावरणपूरक होईल असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले.
गोव्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या आपल्या पद्धतीच्या पहिल्याच सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड फेरीबोट आणि फ्लोटिंग जेटी प्रकल्पांचे पणजीत उद्घाटन केल्यानंतर श्री. सोनोवाल बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी गोव्याच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केले आणि ते म्हणाले की या दोन प्रकल्पांमुळे राज्य अधिक पर्यटकांना आकर्षित करेल. अशा प्रकल्पांमुळे गोव्याला देशातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून बदलण्यात मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सुमारे 3.97 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली सोलर-इलेक्ट्रिक फेरीबोट आणि 9.6 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या जेटी प्रकल्पाचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री सुभाष फळदेसाई, महापौर रोहित मोन्सेरात तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलताना, सोलर-इलेक्ट्रिक फेरीबोट हा गोव्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे तर फ्लोटिंग जेटी हा दुसरा प्रकल्प आहे, असे सांगितले. ही फेरीबोट केवळ प्रवाशी वाहतुकीसाठी वापरात येईल. तिचा प्रथम मार्ग चोडण ते पणजी दरम्यान असेल. प्रायोगिक तत्वावर प्रारंभीच्या 15 दिवसांसाठी ही सेवा विनामूल्य असेल व त्यानंतर तिकीट आकारणी करण्यात येईल. त्यासंबंधी सरकार दर निश्चित करेल, असे पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच लवकरच आणखी दोन सौर फेरी बोटी सुरू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
सदर जेटी ही ठोस काँक्रीटची रचना असून पर्यावरणपूरक आहे. सोलार-फेरीबोटीतून 60 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. तिच्या हायब्रीड डिझाईनमुळे इंधनावरील खर्च कमी झाल्यामुळे ऑपरेटिंग खर्च कमी करण्यात मदत होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी सोलर फेरीबोटीतून मांडवी जलसफरीचा आनंद लुटला.