थकीत वीजबिल माफ करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले निदर्शने
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
राज्य सरकारने थकीत वीजबिल माफ करून नवीन बिल आकारणी योग्यरित्या करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कंदील भेट असे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्रमध्ये अनेक सरकार सत्तेवर येत असताना बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेवर येतात मात्र सत्तेवर आल्यानंतर वीज बिलांच्या संदर्भामध्ये वीज बिलांच्या आकारणीच्या संदर्भामध्ये काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे सरसकट वीज बिल माफ करावे या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने विज बिल फाडो तथा कंदील आंदोलन करण्यात आले.
यावेळी वीज बिल माफ झालेच पाहिजे, एकच पर्व, बहुजन पर्व, आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडीचे अध्यक्ष प्रशांत बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी मिलिंद गायकवाड, एडवोकेट सिताराम सोनवले, प्रशांत बनसोडे, अशोक गायकवाड, खिझर पिरजादे, अनिता बनसोडे, धनश्री सिद्धगणेश, नागेश वाघमारे, शाम मंडले, किरण पांढरे, दिलीप बोडरे महिलांसह युवा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.