पावडर देण्याबाबत शेतकऱयावरदमदाटी, संकेश्वर पोलिसांत एफआयआर दाखल
प्रतिनिधी/ संकेश्वर
मंगळवारी मध्यरात्री अचानक 25 ते 30 जणांची टोळी एका शेतकऱयाच्या घरात घुसली व दमदाटी करीत पावडरीचे पोते देण्याबाबत अरेरावी केली. घरात त्या पावडरचा शोध घेतला. तरीही पावडरीचे पोते मिळाले नसल्याने अखेर हे टोळके माघारी परतले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही घटना सोलापूर (ता. हुक्केरी) येथील निलजीकडे जाणाऱया रस्त्यानजीक अण्णाप्पा माळी-चिकोडी यांच्या घरी घडली. या घटनेने सोलापूर भागात एकच खळबळ उडाली आहे. तसेच टोळक्याने मागणी केलेली पावडर कोणती ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, सोलापूर गावापासून अर्धा किलो मीटर अंतरावर मठद स्वामी शेतानजिक अण्णाप्पा माळी यांचे शेत आहे. शेतातच त्यांचे घर असून माळी कुटुंब तेथेच वास्तव्याला आहे. या शिवारात दोनच घरे आहेत. मंगळवारी मध्यरात्री अचानकपणे 25 ते 30 जणांची टोळी माळी यांच्या घरासमोर आली व त्यातील व्यक्तींनी दार ठोठावले. यावेळी माळी यांनी दार उघडताच टोळीतील व्यक्तींनी घरात काय काय आहे हे सांग, अशी दामदाटी माळी यांच्याकडे केली. शिवाय त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला. इतक्या मोठय़ा संख्येने असलेली ही टोळी पाहून, घाबरलेल्या माळी यांनी आपल्याकडे अमूक इतके सोने व शेतात पीकवलेले ज्वारी तसेच अन्य धान्य असल्याचे सांगितले. या टोळक्यातील काहीजणांनी घरात घुसून ज्वारीची पोती फाडून पाहीली. मात्र त्यांना जे हवे ते मिळाले नाही. त्यामुळे या टोळक्याने माळींकडे ती पावडर कुठे आहे? अशी विचारणा केली. मात्र कोणती पावडर, असे विचारत माळी यांनी मला पावडरबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांना सांगितले. शोध घेवूनदेखील घरात ती पावडर न मिळाल्याने ती टोळी माळी कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीस इजा न करता शिवाय घरातील अन्य कोणतीही वस्तू न घेताच निघून गेली. परत जाताना माळी यांनी त्यांचा मोबाईलदेखील परत केला.
या घटनेची माहिती समजताच संकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चौकशी केली असता, घरात अज्ञात टोळके आले होते. ते कोणत्यातरी पावडरीची चौकशी करत होते, अशी माहिती अण्णाप्पा माळी यांनी त्यांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला असून, सदर टोळक्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी दिली.