आज मंगळवारी घेतला पदभार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी माळशिरसच्या प्रांताअधिकारी शमा पवार यांची नियुक्ती झाली असून आज मंगळवारी पवार यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांना पदभार देण्यात आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारत वाघमारे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळे या पदाचा पूर्णवेळ पदभार भारत वाघमारे यांच्याकडे येईल अशी शक्यता होती. मात्र एक महिन्यापूर्वी माळशिरसच्या प्रांताधिकारी शमा पवार यांची निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली मात्र काही कारणास्तव त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार घेता आला नाही. दरम्यान आज मंगळवार 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडून पदभार स्वीकारला.वाघमारे यांनी त्यांचे स्वागत केले.
तिसऱ्या लाटेसाठी, जिल्ह्याचे विकास धोरणासाठी काम करू
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे जिल्ह्याचे जे विकासाचे धोरण आहे. त्याला साजेसे काम माझ्याकडून होईल, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे, माळशिरस तालुक्यात प्रांताधिकारी म्हणून कोरोना काळात काम केल्याचा निश्चित उपयोग कोरोनाच्या तिसर्या लाटेत होईल असे सांगतानाच फिल्डवर काम करणे आणि कार्यालयात बसून काम करणे यामध्ये बराच फरक असतो मात्र फिल्डवरचा अनुभव या ठिकाणी काम करताना फायदेशीर ठरेल.
– शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर