कुर्डुवाडी/प्रतिनिधी
अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. माऊली मोहन ढेकळे (रा. वडाचीवाडी ता.माढा) असे या मृत युवकाचे नाव आहे. कुर्डुवाडी – माढा रोडवर भोसरे शिवारात पुलाजवळ काल, रविवारी (दि.26) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत नामदेव रामा लोभे (रा. वडाचीवाडी, ता.माढा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी लोभे हे कुर्डुवाडीहून आपल्या गावी वडाचीवाडी येथे जात असताना भोसरे शिवारात पुलाजवळ युनिकॉर्न गाडी( एम एच ४५ एएम २६१८) व एक इसम जखमी अवस्थेत आढळून आला. जवळ जाऊन पाहिले असता तो लोभे यांच्या गावातील त्यांच्या भाच्याचा मुलगा माऊली मोहन ढेकळे हा होता. त्याच्या अंगावरुन कोणीतरी अज्ञात वाहन जाऊन तो गंभीर जखमी झाला होता. लोभे यांनी तात्काळ रुग्णवाहीकेला फोन करून त्याला ग्रामीण रूग्णालयात आणले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लोभे यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.