भारतातील निर्यात तीस टक्के केळी अफगाणिस्तानला होतात निर्यात
प्रतिनिधी / करमाळा
सध्याच्या अफगाणिस्तानावरील तालिबानी वर्चस्वामुळे आगामी काळात केळी निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण केळीपैकी तीस टक्के केळी अफगाणिस्तान येथे निर्यात केली जाते. परिणामी आगामी काळात अफगाणिस्तानातील परिस्थितीत सुधारणा नाही झाली, तर त्याचा फटका केळी निर्यातीवर होण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तानमधील 15 कंटेनरची केळीची ऑर्डर होती. परंतु अफगाणिस्तामधील तालिबानी वर्चस्वामुळे सुरू झालेल्या झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्याची माहिती करमाळा येथील केळी व्यापाऱ्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील केळीला एक प्रकारची विशिष्ट चव व उत्तम दर्जा असल्याने आखाती देशांसह इतर देशांतून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील केळीला मागणी आहे. परंतु, कोरोना संसर्गजन्य रोगाबरोबर नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत असताना आता अफगाणिस्तान येथील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीत घट झाल्यास त्याचा फटका केळी उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक बंद राहिल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतरच्या काळात केळीच्या दरात तेजी निर्माण झाली आहे. परंतु, अफगाणिस्तान येथील तालिबानी वर्चस्वानंतर तेथील अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्यता फारच कमी आहे. अफगाणिस्तान हा इराण नंतरचा सर्वांत मोठा भारतातून केळी आयात करणारा देश आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात थांबल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तानमधील 15 कंटेनरची केळीची ऑर्डर होती. परंतु अफगाणिस्तामधील तालिबानी वर्चस्वामुळे सुरू झालेल्या झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. आता या केळींची निर्यात न झाल्यास खूप मोठ्या नुकसानीस केळी उत्पादक व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.- प्रदीप टांगङे – केळी व्यापारी, करमाळा