विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भूसंपादनासह पहिल्या टप्प्यातील इतर कामांसाठी गती येईल, असे सोलापूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प सुध्दा सादर करण्यात आला. रेल्वेच्या अर्थसंकल्पात सोलापूर विभागासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याची माहिती सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक गुप्ता ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर विभागासाठी काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर या 84.44 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी 20 कोटी निधी देण्यात आला आहे. या निधीतून भुसंपादनासह पहिल्या टप्प्यातील इतर कामांना सुरुवात होईल. अनेक वर्षांपासून सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम प्रस्तावित आहे. केंद्र शासनाकडून येणार्या काळात आणखी निधी मंजूर होईल, असे विभागीय व्यवस्थापक गुप्ता यांनी सांगितले.