कुर्डुवाडी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी :
येथील माढा रोडवरील भरवस्तीत असलेले बँक आॅफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडून त्यामधील ११ लाख ४२ हजार पाचशे रुपये लंपास केल्याप्रकरणी ६ आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांनी भोपाळ पोलिसांकडून ताब्यात घेतले असून त्यांना माढा न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
समशेर उर्फ दलशेर फजरु वय ४० रा. गंगोरा पो.व ता.पहाडी जि.भरतपूर राज्य राजस्थान ,साहाजत उर्फ शहादत उर्फ हाजर खान वय २५ रा.पिनगुवाॅ ता.पुन्हाना जि.नूह हरियाणा,शाकिर फजरु वय ४० रा.गंगोरा पो.व ता.पहाडी जि.भरतपूर राज्य राजस्थान ,आसमोहम्मद फजरुद्दीन वय ३४ रा. नांगली पठाण पो.लंगडवास ता.किशनगढ जि.अलवर राजस्थान,मसी उल्लाह अख्तर वय २१ रा.रामपूरी ता. नूह मेवात राज्य हरियाणा, मुशरीफ खान शरीफ कमरुद्दीन खान वय २७ रा सरस्वास ता. पराणा जि.नूह हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की दि.२४ रोजी रा.१२ वा ५ मि ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान येथील माढा रोडवरील बँक आॅफ इंडिया कुर्डुवाडी शाखेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यामधील ११ लाख ४२ हजार ५०० रुपये चोरून चोरट्यांनी पलायन केले होते.
दरम्यान भोपाळ येथील परवलिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना भोपाळ पोलिसांनी मध्यरात्री गस्त घालताना पकडले. त्यानंतर या सहाही जणांनी तपासात दिलेल्या माहितीनुसार सोलापुर जिल्ह्यातील एटीएम मशीन मध्ये चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे,पो. दत्ता सोमवाड,राहूल रिकिबे,सागर गवळी,दाढे, पठाण या पथकाने ट्रान्सफर वारंटद्वारे सदर संशयीत आरोपींना भोपाळ येथून ताब्यात घेऊन आज माढा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहेत.