प्रतिनिधी / कुर्डुवाडी
सांगोला येथे घडलेल्या गुन्ह्याच्या घटनेतील संशियत आरोपींना पकडण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक बारलोणी ता.माढा येथे आले असता त्यांच्यावर संबंधित आरोपींनी दगडफेक केली यामध्ये पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास बारलोणी ता.माढा येथे घडली.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदर धनाजी गाडे, पोलिस हवालदार मोहन मनसावले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, पोलिस शिपाई धनराज गायकवाड, व चालक पोलिस शिपाई समीर शेख यांचे पथक शुक्रवारी सकाळी बारलोणी गावच्या हद्दीत तपासासाठी पोहचले होते.
पोलिस पथकास पहाताच संबधीत आरोपींनी पोलीस गाडीवर हल्ला चढवित दगडफेक केली. या दगडफेकीत पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत कुर्डुवाडी पोलिसांना वरिष्ठांकडून कळल्यानंतर कुर्डुवाडी पोलिसांनी धावपळ सुरू केली. तत्पूर्वी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके पुढील कारवाईसाठी बारलोणी गावात दाखल झाली आहेत.