तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
घरी विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा जबाब घ्यावयास गेलेल्या आशा वर्करला बाधित महिलेच्या पतीने मारहाण करुन तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केल्याची घटना दि. २१ रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास कव्हे ता. माढा येथे घडली. याबाबत आशा वर्कर शोभा प्रवीण मेहता यांनी सुधीर चोपडे यांच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दि. १४ रोजी सुधीर चोपडे याच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना डॉक्टर आणि ग्रामपंचायतीने कुर्डुवाडी येथील कोविड सेंटर येथे जाण्यास सांगितले असता त्यांनी घरीच विलगीकरणात थांबत असल्याचे सांगितेले. दि.२१ रोजी स.९.३० डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आशा वर्कर शोभा या सुधीरच्या पत्नीचा जबाब घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या त्यावेळी त्या घरी नसल्यामुळे फिर्यादी आशा वर्कर यांनी सुधीर यांच्या मुलीची जबाबावर सही घेतली. याचाच राग मनात धरून सुधीर चोपडे याने फिर्यादीस तिच्या घरी जाऊन मारहाण केली व तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली .