प्रतिनिधी / कुर्डुवाडी
देशामधीलच नव्हे तर जगातील उत्तमोत्तम शेतमाल निर्यात कंपनीच्या कामांप्रमाणे विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनीने अग्रेसर राहण्यासाठी या कंपनीच्या सर्व घटकांनी अहोरात्र झटले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी कंपनीच्या कार्यस्थळावर केले. निमगाव दहिवलीमध्ये माढा तालुक्यातील पहिल्या अत्याधुनिक पॅक हाऊस प्रिकुलींग, कोल्ड स्टोरेज साइटवर आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या सहकार्यांसह भेट दिली. यावेळी सर्व नियोजित कामांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली व काही सूचना केल्या.
यावेळी बोलताना बबन दादा म्हणाले की, “कृषिमाल निर्यात सुविधा व शेतकऱ्यांना उच्चतम प्रतीच्या व योग्य मूल्यांच्या निविष्ठा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान जरी जगामध्ये उपलब्ध होत असेल तरी त्याचा वापर हा शेतकरी कल्याणासाठीच झाला पाहिजे. कृषिमाल निर्यात हा शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय कळीचा मुद्दा असून या निर्यातीचा थेट परिणाम शेतमालाच्या स्थानिक बाजार पेठेवर होताना आपल्याला दिसतो. धनराज शिंदे यांनी स्थापन केलेल्या विठ्ठलगंगा फार्मर्स कंपनीने यावर सविस्तर अभ्यास केलेला दिसतो. विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनीला त्यांच्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये सर्वतोपरी सहकार्य असेल. शासन दरबारी यातील मदत आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभता याविषयी प्रयत्न करू. पन्नास वर्षांपासून सामाजिक आणि शेतकरी सेवेचा वसा कै. विठ्ठल भाऊंच्या कुटुंबाने जपलेला असून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांच्या सेवेला आम्ही प्रथम प्राधान्य दिले आहे. आम्हा तीन बंधूंच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्साही, अभ्यासू तरुण धनराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत असलेली “निर्यात सुविधा ही हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग निश्चितपणे ठरेल याची खात्री आहे.
यावेळी विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य प्रवर्तक धनराज शिंदे, निमगावचे सरपंच रवींद्रदादा शिंदे, महेश डोके, राहुल वरपे, विलास देशमुख, आनंद पानबुडे, तोहित सय्यद, अमर शहा, महेश मारकड, सुजीत भोसले, स्वीय सहाय्यक बापू शिंदे, नितीन मराठे आदी उपस्थित होते.