पोलिसांच्या सतर्कतेमुळे साडेचार लाख रुपये व ४ किलो चांदी सुरक्षित
प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट येथील येथील हिरोळी वागदरी बार्डरवरील श्री भाग्यवंती देवीचे मंदिरासमोर वागदरीकडे जाणारे रोडवर एका ७१ वर्षीय व्यापा-याचा पायी चालत जात असताना अचानक चक्कर येउन खाली पडून जागीच मयत झाल्याची घटना दि ११. रोजी बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत गणपती एखंडे ( वय ७१ वर्ष) रा तळंदगे ता. हातकंणगले जि. कोल्हापूर असे मयताचे नांव आहे.
वागदरी येथे तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी एस. आर. राऊत, ए.बी. राठोड यांनी मयताला प्रथमोपच्चार व वैद्यकिय मदत मिळवुन देतानाच मयताकडे असलेल्या चार लाख ४६ हजार रूपये रोख रक्कम व सुमारे तीन ते चार किलो चांदीची वीट अंदाजे किंमत एक लाख असे सुमारे साडेपाच लाख रूपयाचा ऐवज हस्तगत केला. याची उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली असुन खबर शेतकरी शिवकुमार इरय्या मठपती (वय २८ वर्ष) रा. वागदरी यांनी दिली. याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी साडेबारा वा.चे सुमारास हिरोळी वागदरी बार्डरवरील श्री भाग्यवंती देवीचे वागदरीकडे जाणारे रोडवर चेकपोस्ट करीता बसविण्यात आलेला लोंखडी पत्राच्या डब्यासमोरील रोडने वागदरीकडे चालत जात असताना व्यापारी चक्कर येऊन मृत झाला.
तो एक सुटकेस व एक पिशवी (पोत्यासारखी )घेऊन जात असताना त्याला अचानक चक्कर आल्याने तो रोडच्या बाजूला जमीनीवर पडल्याने लागलीच बॉर्डर डयुटीवर वाहन चेक करीत असलेल्या पोलीसांनी व खबर देणाऱ्यांनी इसमास हालवुन उठविण्याचा प्रयत्न केला. पंरतु त्यांनी कसलाही प्रतीसाद दिला नसल्याने लागलीच १०८ अँन्बुलन्स बोलावून घेउन त्यावरील डॉक्टर उमेष कराळे यांनी तपासुन पाहिले असता मृत्यू झाल्याचे सांगितले.
मृताच्या अंगावरील कपडे तपासून पाहिले असता मृताचे खिशातील कागदपत्रावरून ओळख पटली. मयताच्या मोबाईल मधील डाईल केलेला मोबाईल नंबरवरून नातेवाईकांना संपर्क केला. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांनी भेट दिली. मयताचा जागेवर पंचनामा करून रोख रक्कम व चांदी पोलीसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.