तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील चिखर्डे या गावातील दोन वृद्ध महिला दिनांक 27 जुलैच्या सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता वाहनाने दिलेल्या धडकेमुळे जागीच ठार झाल्या आहेत. मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अनोळखी वाहनाने धडक दिली. या जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्याची घटना आज (ता. 27) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चिखर्डे-गोरमाळे रस्त्यावर चिखर्डे (ता. बार्शी) गावापासून एक किलोमीटर अंतरावर अनिल बारंगुळे यांच्या शेताजवळ घडली. सुशीला महादेव पाचकवडे (वय 70), महानंदा दत्तू कोंढारे (वय 65) असे या अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत संतोष माधव पाचकवडे (वय 40 रा. चिखर्डे) यांनी पांगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की चिखर्डे येथील सुशीला महादेव पाचकवडे व महानंदा दत्तू कोंढारे या दोन महिला नेहमीप्रमाणे चिखर्डे-गोरमाळे रस्त्यावर मॉर्निग वॉक करत असत. काल सकाळी त्या गावापासून अनिल बारंगुळे यांच्या शेतापर्यंत गेल्या असता भरधाव वेगात आलेल्या अनोळखी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या. घटनेनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पांगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.