९ लाख ८० हजाराचे मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील ट्रॅक्टरचलीत मळणी यंत्र दुरुस्ती साठी अक्कलकोट येथील मेकॅनिक जवळ लावण्यात आले होते.दुरुस्तीसाठी ठेवलेल्या मळणी यंत्राची चोरी केलेल्या चोरासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. एक महिन्याच्या आत आरोपी सह मळणी यंत्र गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोधून काढले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगवी खुर्द येथील श्रीधर सिद्राम लवटे यांनी ६ सप्टेंबर रोजी स्वतःचे ट्रॅक्टरचलीत मळणी यंत्र बिघाड झाल्याने अक्कलकोट माणिक पेठ नूरअहमद इंजिनिअरिंग वर्क्स येथे लावले होते. मेकॅनिक यांनी मळणी यंत्र दुरुस्ती करून ठेवले असता अज्ञात चोरट्याने लंपास केली होती याबाबत दि १३ सप्टेंबर रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना मळणी यंत्राची माहिती समजताच त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या माध्यमातून मळणी यंत्र व चोरट्याला ताब्यात घेतले. धानय्या महादेवय्या स्वामी वय २१ रा जमगा (जे ) ता आळंद जि गुलबर्गा असे चोरट्याचे नाव आहे.
त्याच्याकडून ४ लाख ३० हजार किंमतीचे मळणी यंत्र, ५ लाख ५० हजार किंमतीचे ट्रॅक्टर इंजिन असे एकूण ९ लाख ८० हजारचे मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यात आले असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार गजानन गायकवाड, प्रमोद शिंपाळे, अश्फाक मियांवाले, चिदानंद उपाध्ये यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत पुजारी हे करीत आहेत.