जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती
प्रतिनिधी / सोलापूर
शैक्षणिक गुणवत्ता विकास व इतर विषयावर चर्चा तसेच शैक्षणिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज शनिवार 9 जानेवारी रोजी जिल्ह्याभरात 100 केंद्र प्रमुख मुख्यालयात शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात महिन्याच्या दुसर्या अथवा चौथ्या शनिवारी केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. बाह्य निरीक्षकांच्या उपस्थिती ही एकदिवसीय शिक्षण परिषदेचे आयोजन जिल्ह्यात 100 ठिकाणी सकाळी 11 ते 4 यावेळेत आयोजित केले आहे.
यामध्ये केंद्रप्रमुख व सीआरजी सदस्य यांनी मागील शैक्षणिक प्रक्रियांचा आढावा. शाळा राबवित असलेले उपक्रम, प्रयोग व त्यातून मुलांच्या ज्ञानात झालेली बढती अथवा शिक्षणाला मिळालेली गती. विद्यार्थ्यांची 100 टक्के आधारनोंदणी. जलजीवन मिशनअंतर्गत शाळांना स्वतंत्र नळजोडणी, आदी गुणवत्ता विषयांवर चर्चा या परिषदेमध्ये होणार आहे. याकरिता सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.