चार चाकी, तीन चाकी 226 वाहने सोडण्यात आली
प्रतिनिधी / सोलापूर
देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. या काळात पोलिसांचा आदेश डावलून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी धारकांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने नॉर्थकोट मैदान तसेच पोलीस मुख्यालय येथे अटकाव करून ठेवली आहेत. राज्य शासनाने लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीन जून पासून अंशत व्यवहार सुरू होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जप्त केलेली वाहने सोडण्याचा निर्णय घेतला असून आज मंगळवारी वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आलेली चार चाकी तसेच तीन चाकी अशी एकूण 226 वाहने सोडण्यात आली आहेत.
वाहने सोडण्यात संदर्भात पोलिसांनी वेळापत्रक तयार केले असून वाहनधारकांनी या वेळापत्रकाप्रमाणे तसेच वेळेप्रमाणे वाहने घेऊन जावे असे नियमावली तयार केली आहे. मंगळवारपासून केवळ लॉक डाऊन कालावधीतच जप्त केलेली वाहने सोडली जाणार आहेत. वाहन सोडविण्याकरता येताना वाहनांची सर्व मूळ कागदपत्रे, स्वतःचे आधार कार्ड, लायसन सोबत नेणे आवश्यक असून दंडाची रक्कम भरण्याकरता २५० रुपये सुट्टी घेऊन यावेत, अन्यथा वाहन मुक्त केले जाणार नाही अशी सूचना पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ज्या वाहनचालकाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत, अशा वाहनचालकाने सोशल मीडियावर लक्ष देऊन आपल्या वाहनांचा क्रमांक तपासून वेळापत्रकामध्ये दिलेल्या दिवशी यावे. वाहन सोडवण्यासाठी येताना प्रत्येकाने मास्क, सनिटायझर याचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टन्स व शिस्तीचे पालन करावे. नार्थकोट मैदान येथे सकाळी ९ ते बारा आणि सायंकाळी चार ते सात या कालावधीत वाहने दंडाची रक्कम जमा करून सोडली जाणार आहेत. मंगळवर दोन जून रोजी फक्त चार चाकी व तीन चाकी वाहने सोडली जाणार आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांनी या दिवशी गर्दी करू नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिंब यांनी केले आहे.
पोलीस ठाणे स्तरावरही वाहने सोडण्याची कारवाई
पोलीस ठाणे निहाय जप्त करण्यात आलेली वाहने त्या त्या पोलिस ठाण्याच्या स्तरावर सोडण्यात येणार आहेत. त्या वाहनधारकांना मोटार वाहन कायद्याप्रमाणे नोटीस दिलेली असेल त्यांची वाहने वाहतूक शाखेच्या परवानगीने सोडली जाणार आहेत. अशी माहिती बाळासाहेब भालचिम (पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, सोलापूर) यांनी दिली.