शहरात 5 तर ग्रामीणमध्ये 412 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात नऊ आणि शहरात एक अशा एकूण दहा रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. शहरात पाच तर ग्रामीण भागात 412 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात शुक्रवारी 412 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 412 पैकी 252 पुरुष, 160 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 3282 जणांचा मृत्यू झाला आहे. जिह्यातील ग्रामीण भागात एकूण एक लाख 59 हजार 471 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित चार हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली. शुक्रवारी 17435 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 17023 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 412 पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण एक लाख 51 हजार 796 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
सोलापूर शहरात नव्याने पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर नऊ रुग्ण बरे होऊन घरी परतले. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापूर शहरात 604 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 599 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुष तर एका स्त्रीचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 हजार 108 झाली आहे.