तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
न्यू पाच्छा पेठेत मटका जुगाराच्या कंपनीत छापा मारायला गेलेल्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर मटका कंपनीत काम करणाऱ्याने इमारतीवरून उडी मारली. त्यात तो जागीच ठार झाला. परवेझ नुरूद्दीन इनामदार (वय 42, रा. साईनाथ नगर, भाग 1, नईजिंदगी सोलापूर) असे मृतांचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
परवेझ इनामदार हा न्यू पाच्छा पेठेतील एका मटका जुगार कंपनीत चिठ्ठा गोळा करून त्याचा हिशोब ठेवण्याचे काम करीत होता. दरम्यान न्यू पाच्छा पेठ कोंचीकोरवे गल्ली येथे एका दुमजली घरामध्ये मटका कंपनी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील काहीजणांनी पळ काढला तर तेथे असलेला परवेझ इनामदार याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असतानाच त्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला.
शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोरच त्याने उडी मारल्याने नेमके तेथे काय घडले याबाबत अधिकृत काहीच सांगण्यात आले नाही. न्यू पाच्छा पेठ हा परिसर जेलरोड आणि सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे घटनास्थळ नेमके कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे हे न समजल्याने गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जेलरोड आणि सदर बझार पोलीसांना कळवले. त्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोगल आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी तसेच सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळुंखे आणि त्यांचे इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. परंतु घटना घडलेली इमारत ही जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते हे समजल्याने जेलरोड पोलीसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवला. याबाबत रात्री उशिरापर्यत पोलीसांकडून नोंद करण्याचे काम सुरू होते.
शहरात खुलेआम मटका
सोलापूर शहरात मटका बंद असल्याचे शहर पोलीसांकडून सांगितले जात होते परंतु या घटनेमुळे शहरात मोठ्याप्रमाणात मटका खुलेआम सुरू असल्याचेच उघड झाले आहे. परवेझ इनामदार हा मृत झाला त्या इमारतीमध्ये मट्नयाच्या चिठ्ठ्या मोठ्याप्रमाणात आढळून आल्या. एका नगरेसेवकाची ही मटका कंपनी असल्याचे परिसरातील लोकांकडून चर्चा केली जात होती.
.