प्रतिनिधी / कुर्डुवाडी
अहमदपूर जि.लातुर येथून पुण्याकडे गाय घेऊन चालेल्या पिकअपची व मुंबईहून बार्शीच्या दिशेने जाणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले तर पिक-अपमधील गायीचा जागेवर मृत्यू झाला ही घटना कुर्डुवाडी – बार्शी रस्त्यावर चिंकहिलनजीक पेट्रोलपंपासमोर दि.२१ रोजी दु. ४ वा सुमारास घडली.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की अहमदपूर येथून पुणे येथे गाय सोडण्यासाठी निघालेला पिक अप क्र. एम एच २४ ए यु ३५५३ हा कुर्डुवाडी – बार्शी रोडवरील चिंकहिल ट्रेनिंगसेंटर समोरील पेट्रोलपंपानजीक आला असता मुंबईहून बार्शीकडे निघालेला टँकर क्र. एम एच ४६ ए एफ ६३१० यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पिकअप मधील गजानन महादेव केंद्रे हा गंभीर जखमी झाला तर चालक बळीराम ज्ञानोबा केंद्रे अहमदपूर याच्या डोक्याला मोठी दुखापत झालेली आहे.
दरम्यान अपघातस्थळी असलेल्या इसमांनी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिकांना बोलावण्यासाठी फोन लावले परंतू एकही रुग्णवाहीका उपलब्ध झाली नाही. शेवटी फिरोज हजरत शेख याने पोलिसांच्या परवानगीने आपल्या स्वतःच्या इर्टिगा गाडीतून जखमींना कुर्डुवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. टँकर चालक कुतबुद्दीन इमाम शेख वय ३४ रा. वाडोना खु.ता उदगीर जि. लातुर सोबत क्लिनर जगदीश महेंद्र यादव रा.शिवडी मुंबई यांना कुर्डुवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.