हाथरस येथील घटनेचे पडसाद ; ‘रेल रोको आंदोलन’
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दलित तरुणीच्या बलात्कार व हत्या प्रकरणी तसेच दलितांवरील देशभरात वाढत्या आत्याचराच्या निषेधार्थ आज मंगळवारी सोलापूर शहरातील ‘डेमोक्रेटीक युथ फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे जाणारी ‘उद्यान एक्सप्रेस’ रेल्वे रोखून धरली. याप्रसंगी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. हथरस येथील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, योगी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री अजय भीष्ट (योगी) यांच्यासह पोलिस प्रशासन व तेथील जिल्हा अधिकारी यांच्यावर देखील कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करुन सहआरोपी केले पाहिजे. या मागण्यांसह जो पर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत देशभर आंबेडकरवादी तरुण ‘जन आंदोलन’ करतच राहतील, असे आंदोलकांनी सांगितले. सदरचे रेल रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी सत्यजित वाघमोडे, अतिष बनसोडे, सोहन लोंढे, अनुराग सुतकर, सुमित शिवशरण, मनोज भालेराव व डेमोक्रेटीक युथ फ्रंट, सोलापूर (DYFS) च्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.