प्रतिनिधी / कुर्डुवाडी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून माढा तालुक्यातील उपळाई बु. येथील डॉ. अश्विनी तानाजी वाकडे यांनी अखेर सहाव्या प्रयत्नातून यशाला गवसणी घातली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उपळाई बु. येथील आश्विनी वाकडे यांनी सहाव्या प्रयत्नानंतर यूपीएससी परीक्षेत २००वी रँक मिळवली. आश्विनी हीचे प्राथमिक शिक्षण सांगोला व घेरडी येथे, तर पुढील शिक्षण नवोदय पोखरापूर येथे झाले आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण बार्शी शिवाजी महाविद्यालयात झाले. बी जे मेडिकल पुणे येथे एम बी बी एस ची पदवी मिळवून काही काळ मेडिकल ऑफिसर म्हणूनही काम पाहिले.
वाकडे यांच्या कुटुंबात एक IAS, एक तहसीलदार, एक मुख्य वित्त व लेखा अधिकारी एवढी पदे आहेत. तर वडिल सेवानिवृत्त सहा.फौजदार होते. अशा विद्याविभूषित कुटुंबातील आश्विनीने आपल्या मोठ्या भावंडांचा आदर्श व आईवडिलांच्या प्रेरणेने हे यश संपादन केले असल्याचे सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल उपळाई सह तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.