प्रतिनिधी / कुर्डुवाडी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी घरच्या घरी शाडूच्या मातीचा व नैसर्गिक रंग वापरून गणपती बनवण्याची परंपरा थिटे परिवाराने कायम ठेवली आहे. यावर्षी थिटे परिवारातील तिस-या पिढीतील अभिरुची हीने हा गणपती बनवला आहे.
ढगाच्या उशीवर पहूडलेला श्री गणरायाला मुषक वारा घालत असलेला देखावा तयार केला असून अनेक जण हा गणपती पहायला येत आहेत आणि अभिरूचीचे कौतुकही करत आहेत. थिटे परिवारातील अशोक थिटे सरांनी ही परंपरा चालू केली. त्यांचे निधनानंतर ही परंपरा खंडीत झाली होती. परंतू सहा वर्षांपूर्वी अतुल व अभय थिटे या भावांनी पुन्हा इको फ्रेंडली गणपती बनवण्यास प्रारंभ केला. वेगवेगळ्या स्वरूपात हे गणपती बनवले गेले. विशेष म्हणजे यांचा भाचा अमेय नरळे (पुणे) हाही गत तीन वर्षापासून घरच्या घरी इको फ्रेंडली गणपती बनवतो आहे.
यावर्षी अभिरुची अभय थिटे हीने हा इको फ्रेंडली गणपती बनवला असून तिला यासाठी अमोद, आर्य, अनुजा व अभिरूप या भावंडानी तसेच आई अनुष्का व काकू अक्षता यांनी मोलाची मदत केली.