तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पंढरपुरातील शेतकरी कुबेर घाडगे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोबईल टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करत आहे.
मागील कित्येक महिन्यापासून सातबारावरील नोंदीची दुरुस्ती करुन घेण्यासाठी हा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे घालत आहे. इतके महिने प्रयत्न करुनही काम न झाल्याने निराश झालेल्या या शेतकऱ्याने आज मंगळवारी सकाळच्या सत्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली.
त्याच्या या आंदोलनानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या विनवणीनंतरही तो आंदोलन बंद न करता टॉवरवरच बसून आहे. परिसरातील लोकांनी हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गर्दी केली आहे.