प्रतिनिधी / सोलापूर
मोहोळ येथील पेनुरच्या कोरोनाबाधित महिलेचा रविवारी रात्री मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनाचा सातवा बळी गेला आहे. दरम्यान सोलापूरच्या मोदी स्मशानभूमीत त्या महिलेचे अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 128 वर गेली आहे. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मोहोळ येथील पेनुरच्या कोरोना पॉझिटिव महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मोहोळ येथील ती महिला सात महिन्याची गर्भवती होती. तिला त्रास होऊ लागल्याने विजापूर रोडवरील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
चक्कर आल्यानंतर तिला सात रस्ता येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर पंढरपूर येथील दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. पंढरपूर येथील रुग्णालयात या महिलेची 23 एप्रिल रोजी प्रसूती झाली. दोन अपत्ये झाली. त्यानंतर तिला सर्दी , ताप हा त्रास सुरू झाला. दरम्यान एका बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेला सोलापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेवर सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असून त्यासाठी महापालिका प्रशासन तयारी करीत आहे.