50 भाविकांच्या उपस्थिती पालखी मिरवणुकीला परवानगी
नंदीध्वज मिरवणुकीसाठी मानकर्यांची आग्रही भूमिका
प्रतिनिधी / सोलापूर
गेल्या दोन महिन्यांपासून यात्रेच्या परवानगीसाठी मंदिर समिती, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून बैठका घेऊन मागणी करण्यात आली आहे. आजपासून यात्रेच्या मुख्य विधीला प्रारंभ झाले. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणत्याच प्रकारचे आदेश मिळाले नाहीत. आम्ही यात्रा करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. प्रशासनाच्या सूचनांची वाट बघू अन्यथा प्रशासनाने मानकर्यांच्या मागण्या मान्य केल्याचे समजून परंपरेप्रमाणे यात्रा करू,असे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यात्रेतील धर्मिक विषयांची माहिती घेण्यासाठी हिरेहब्बू वाड्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा परवानगी विषयी प्रशासनाने कमालीची गुपप्ता पाळली आहे. मंदिर समिती, मानकरी व लोकप्रतिनिधी यांच्या बैठका झाल्या असल्या तरी त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याने मानकरी संभ्रमावस्थेत आहेत. अवघ्या दोनच दिवसावर यात्रा आली असताना प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची सूचना प्राप्त झाली नाही. परंतु मंदिर समिती, मानकरी यांच्यावतीने श्री सिध्दरामेश्वरांच्या अक्षतासोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
50 लोकांच्या समवेत पालखी मिरवणूक करावे. तसेच नंदीध्वज मिरवणुकीने 68 लिंगाची लिंगपूजा न करता केवळ वाड्यातून नंदीध्वज हे श्री सिध्दरामेश्वर मंदिरात आणून पूजन करण्यात यावे, अशा पध्दतीच्या धार्मिक विधींना प्रशासनाकडून मान्यता यापूर्वी देण्यात आली आहे. मात्र मानकर्यांकडून नंदीध्वज मिरवणुकीला परवानगी देण्याची आग्रही भूमिका आहे. प्रशासनाने भाविकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने परंपरेप्रमाणे यात्रेतील धार्मिक विधी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही मानकरी भीमाशंकर म्हेत्रे यांनी केली यावेळी केले.
या पत्रकार परिषदेस सागर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, सुदेश देशमुख, राजू देशमुख, सोमनाथ मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, योगीनाथ कुर्ले, सुरेश म्हमाणे, गंगू कल्याणकर, सोमनाथ सरडे, बाळासाहेब मुस्तारे, राजू आमणगी, मल्लिकार्जुन कुंभार आदी उपस्थित होते.
आज 56 घागरींचे पूजन अन् केळवण
आज रविवारी सकाळी 11 वाजता विधीवत कुंभार कन्येच्या परिवारातून 56 मातीच्या घागरींचे पूजन करून हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तसेच अक्षतासोहळ्यापूर्वी होणारा केळवणाचा कार्यक्रम म्हणून आज शेटे यांच्या घरात योगदंडाची पूजनाने होत आहे.