प्रतिनिधी / कुर्डुवाडी
बंद दुकानाच्या शटरचा कोयंडा तोडून चोरी करत असताना एक चोर दुकानातच सापडला तर दुसरा ३२ हजार घेऊन लंपास झाला. ही घटना दि. १२ रोजी मध्यरात्री दत्तनगर बायपासरोड भोसरे येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आदित्य संतोष मुकने याचे दत्तनगर भोसरे ता.माढा येथे किराणा दुकान असून त्याने पाडवा सणासाठी व वडिलांच्या उपचारासाठी म्हणून दुकानात एका काळ्या बॅगमध्ये ३२ हजार रूपये ठेवले होते. पुणे येथून कुर्डुवाडी येथील हॉस्पीटल मध्ये अॅडमिट करण्यासाठी फिर्यादीचे मामा फिर्यादीच्या वडिलांना घेऊन रुग्णवाहिकेने रात्री १२ वाजता कुर्डुवाडीत आले .त्यावेळी फिर्यादी ,त्याची आई व बहिण हे दुकानाचे शटर बंद व आतील घराचा दरवाजा बंद करुन हॉस्पीटल मध्ये गेले.त्यानंतर वडिलांना अॅडमिट करुन रुग्णवाहिकेचे पैसे देण्याकरिता रुग्णवाहिका घेऊन घरी आलो.त्यावेळी आमची गाडी पहाताच एक इसम तेथून पळून गेला. दुकानाकडे पाहिले असता दुकानाचे अर्धे शटर उघडे दिसले.
शटरचे लॉकचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यावेळी मामा ,आई आम्ही सर्वांनी दुकानात पाहिले असता एक इसम दुकानात लपलेला दिसला. फिर्यादीने लगेच शटर लावून कुलूप लावले व मित्रांना फोन करुन बोलावून घेतले. शटर उघडून पाहिले असता दुकानात लपलेला इसम जागीच पकडला व त्याला विचारणा केली असता त्याने त्याचे नाव चंद्रकांत झुंबर काळे वय २९ रा भांबुरे वस्ती असे सांगितले.दुकानात ठेवलेली पैशांची बॅग शोधली असता दुकानाच्या बाजूस बरेच सामान पडलेले दिसले त्यामध्ये पैसे ठेवलेली बॅग ही होती.परंतू त्यामधील पैसे मिळून आले नाहीत.सापडलेल्या इसमाकडे चौकशी केली असता पळून जाणारा इसम भीमराव रज्जाक काळे असल्याचे समजले.पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीच्या मित्रांनी भांबुरेवस्ती येथे जाऊन शोध घेतला असता भीमराव रज्जाक काळे हा मिळून आला. या दोघा चोरट्यांविरुद्ध फिर्यादी मुकने याच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.