तरुण भारत संवाद वार्ताहर / पंढरपूर
नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काही काळ दिलासा मिळाला होता. परंतु ऊर्जामंत्र्यांनी पुन्हा महावितरणाला थकीत बील वसुलीसाठी वीज तोडणीचे आदेश दिले आहेत. याच्या निषेधार्थ उद्या (रविवारी) पंढरपुरात येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बळीराजा शेतकरी संघटनेकडून काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार असल्याची माहिती माऊली हळणवर यांनी दिली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी पंढरपूर दौर्यावर येणार आहेत. वीज तोडणीचा निषेध करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणार आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन काळात महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवली आहे. हे वीज बील माफ करावे म्हणून वारंवार पाठपुरावा व आंदोलन केली.तरीही महावितरणे ग्राहकांची वीज तोडणी सुरू केली आहे. ज्यांनी वीज बिले भरली आहेत अशा शेतकऱ्यांचे डीपी (रोहित्र) उतवरले आहेत. नेत्यांच्या स्मारकाला मोठा निधी दिला जातो. परंतु शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत दिली जात नाही. उर्जा मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावथी रूपयांची उधळपट्टी केली जाते. परंतु शेतकऱ्यांना एक रूपया ही सवलत दिली जात नाही.
निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी वीज बील भरू नये असे आवाहन केले होते आता त्यांचेच सरकार वीज बील वसुलीसाठी वीज कट करत आहे. दुटप्पी सरकारचा निषेध म्हणून उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेध केला जाणार आहे. अजित पवारांना निवडणुकीसाठी वेळ आहे परंतु शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत डीपी सोडवले जात आहेत. तरी हे सरकार गांभीर्यानं घेत नाही म्हणून कोर्टी रोड येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी केले आहे.