तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती यंदाच्या हंगामामध्ये विक्रमी व उच्च दर्जाच्या उडीदाची होत असलेली आवक पाहता आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील साहेब व जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोलापूर यांच्याकडे 9 सप्टेंबर 2020 रोजी बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीस उडीद व हमीभाव खरेदी केंद्र मिळावे यासाठी पत्रव्यवहार केला व या हमीभाव केंद्राची मागणी उचलून धरून पाठपुरावा केला.
सध्या उडीद हमीभाव 6300 रू. व मुगाचा 7100 रू. आहे. परंतु ज्यादा आवक झाल्याने सध्या उडीद 4000 ते 5500 रू. पर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळतो व मुगाचा भाव 5000 ते 6000 रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळतो. या गोष्टींचा विचार करून शेतकरी बांधवांना मूग व उडीद याचा शासन हमीभाव मिळावा म्हणून आमदार राजेंद्र राऊत हे प्रयत्नशील होते. मागील पंधरा दिवसात बार्शीच्या बाजार समितीत उच्चांकी प्रमाणात उडीद व मुगाची आवक झालेली आहे बार्शी तालुक्यात यंदा सर्वाधिक उडीदाचे विक्रमी उत्पादन झाले असून या बाजार समितीत बार्शी सोबत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील माल विक्रीसाठी येत आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीनुसार बाजार समितीस उडीद व मुगाची आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करावयाच्या मूग, उडीद खरेदी केंद्रासाठी बाजार समितीचे सब एजंट म्हणून तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सहकारी संस्था मर्यादित उंबर्गे, ता.बार्शी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हंगाम 2020 – 21 मध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करताना पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावयाची असून नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचेआधार कार्ड, सातबारा उतारा, पिक पेरा, बँकेचे पासबुक हे कागदपत्रे आवश्यक असून ती स्कॅन करून शेतकरी नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज अर्ज त्यादिवशी ऑनलाइन नोंदणी करून पूर्ण करावयाचे आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑफलाइन फॉर्म दप्तरी ठेवू नयेत नोंदणी करताना पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कागदपत्राची माहिती अचूक भरावी जेणेकरून शेतकऱ्यांचे मालाचे पेमेंट मिळण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. तरी दिनांक 15 – 9 – 2020 पासून खरेदी केंद्राच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची मूग व उडीद खरेदी करता ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.