जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांनी भगवा फेटा बांधून केला सत्कार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
भारतीय जनता पार्टीने झिडकारल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांना शिवसेनेने जवळ केल्याचे शनिवारी दिसून आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेश पाटील यांचा भगवा फेटा बांधून सत्कार केला. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत पाटलांना आधार देण्यात आला.
बुधवारी झालेल्या महापालिका सभेत नगरसेवक सुरेश पाटील यांनी समान निधी वाटपाच्या कारणावरून महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यावर आरोप केले होते. त्यांना अडचणीत आणण्याच्या हेतूने सभागृहात गोंधळ घातला. त्या दिवशी समान निधीची मागणी करत विरोधकांनी महापौरांना घेराव घातला होता. त्या घटनेचा राग मनात धरून सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱयांनी विरोधकांना सोबत घेऊन शुक्रवारी झालेल्या महापालिका सभेत नगरसेवक पाटलांचा `गेम’ केला. जोरदार शेरेबाजी करून महापौरांचा अवमान केल्याने पाटलांचे निलंबन करावे, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर महापौरांनी पाटलांचे एक दिवसाकरिता निलंबन केले.
या घटनेला चोवीस तास होण्याच्या आत शिवसेनेकडून भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सुरेश पाटील यांच्या घरी जाऊन भगव्या रंगाचा फेटा बांधून सत्कार केला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे आदी उपस्थित होते. यातून शिवसेना-भारतीय जनता पार्टीमध्ये सोलापुरात संघर्षाची शक्यता वर्तविली जात आहे. सुरेश पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात असलेल्या वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहे.
दरम्यान, सुरेश पाटील हे शिवसेनेत येणार का? असे विचारले असताना बरडे यांनी नाही असे उत्तर दिले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जर एखादा सदस्य अतिक्रमणे काढण्यास विरोध करत असेल तर, त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते हे माहीत असताना देखील अतिक्रमण वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱया नगरसेवकांचा नेमका हेतू काय? हेसुद्धा सोलापूरकरांना चांगले माहीत आहे. आगामी काळात जनताच यांना धडा शिकवेल, असे बरडे यांनी म्हटले आहे.
शिवसैनिक त्यांच्या पाठीशी
सुरेश पाटील हे गेली 30 वर्षे नगरसेवक आहेत. घोंगडे वस्ती येथील घरे पाडण्याच्या घटनेत त्यांचा काही संबंध नाही. महापालिका सभेत पाटलांविरोधात त्यांच्या पक्षाने इतरांना सोबत घेऊन निलंबनाची कारवाई केली. माझे आणि त्यांचे जुने कौटुंबिक संबंध आहेत. कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर कारवाई झाल्याने आम्हाला वाईट वाटले. शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्यासोबत जनता आहे. कोणी कितीही अडचणी आणल्यातरी प्रभागाचे नेतृत्व तेच करणार आहेत.
– पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख.